राज्य सरकारने कोरोनासाठीचे निर्बंध शिथिलीकरणाला सुरुवात केली असून १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या निर्णयानंतर लोक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करणार याची कल्पना असतानाही पालिकेने कोणतेही नियोजन केलेले नव्हते.
पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंगळवार रात्रीपासून रांगेत उभं राहूनही बुधवारच्या लसीकरणासाठी टोकन न मिळाल्याने नागरिकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे गोंधळ निवळला.
कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिर आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोनच ठिकाणी लस उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी दोन्ही केंद्रांवर गर्दी केली होती. आचार्य अत्रे रंगमंदिर लसीकरण केंद्रावर नागरिकांनी मंगळवारी रात्रीपासूनच रांग लावली होती. बुधवारी सकाळी टोकन देण्याचे काम सुरू झाले आणि काही वेळातच टोकन संपल्याचे केंद्रावर सांगण्यात आले. टोकन संपल्याने सोनाली पाठारे या तरुणीने लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पहाटे तीन वाजल्यापासून त्या रांगेत उभ्या होत्या. टोकन संपलेच कसे असा प्रश्न त्यांनी विचारला आणि नंतर गोंधळ झाला. टोकनचा काळाबाजार केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमावाला शांत केले आणि मुख्य गेट बंद करून पालिका सुरक्षा रक्षक आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला.
हे ही वाचा:
अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट
चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!
सावधान! रस्त्यावर थुंकणाऱ्याला करावी लागणार सेवा
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पालिका उपायुक्त पल्लवी भागवत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आज ५०० जणांना लस देण्याची तयारी होती; मात्र रांग मोठी होती. रांगेतील नागरिकांना टोकनबाबत गैरसमज झाला. नागरिकांच्या तक्रारींची नोंदणी केली असून त्यात तथ्य असल्यास त्याची विचारणा केली जाईल. गोंधळ होऊ नये म्हणून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल, अशी माहिती कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत यांनी दिली.