चांद्रयान ३च्या लँडर मॉड्युलने अंतिम डिबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. चांद्रयान आता चंद्रापासून २५ किमी x१३४ किमीच्या कक्षेत फिरत आहे. म्हणजे लँडर आता चंद्रापासून किमान २५ किमी तर कमाल १३४ किमीच्या कक्षेत फिरत आहे. आता मॉड्युलची आंतरिक तपासणी होईल. आता निर्धारित लँडिगच्या स्थळी त्याला सूर्योदयाची वाट पाहावी लागेल. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
‘डिबुस्टिंग’ ही लँडरला कक्षेमध्ये स्थापित करण्याची प्रक्रिया आहे. ज्यात कक्षेचा चंद्रापासूनचा किमान बिंदू ३० किमी तर कमाल बिंदू १०० किमी. आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ३० किमी उंचीवर लँडर ‘पॉवर्ड ब्रेकिंग’ टप्प्यात प्रवेश करेल. या वेळी चंद्र पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी त्याच्या थ्रस्टर्सचा उपयोग करू लागेल. सुमारे १०० मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर लँडर पृष्ठभागाची तपासणी करून काही अडथळे नाहीत ना, याची चाचपणी करेल. त्यानंतर पृष्ठभागावर हलकेच उतरण्याची तयारी सुरू केली जाईल.
इस्रोने शुक्रवारी चांद्रयान-३ने चंद्राची जवळून काढलेली छायाचित्रे जाहीर केली. लँडर मॉड्युलमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याने १५ ऑगस्ट रोजी ही छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांत चंद्राच्या पृष्ठभागावरील खड्डे स्पष्ट दिसत आहेत. काही छायाचित्रे लँडर मॉड्युल प्रोपल्शन मॉड्युलपासून अलग झाल्यानंतर काढण्यात आली आहेत.
हे ही वाचा:
‘रघुराम राजन राजकीय नेते झाले आहेत’!
कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क !
निवडणुकांची भीती नेमकी कोणाला?
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
‘देशाला मोठ्या रॉकेटची गरज’
इस्रोचे माजी प्रमुख के. सीवन यांनी देशाला मोठ्या रॉकेटांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले. ‘भारत नेहमी कमी खर्चिक अशा इंजिनीअरिंगवर भिस्त ठेवू शकत नाही. देशाला मोठ्या रॉकेटांची आवश्यकता आहे. त्यासाठी अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले.