भारताने इराणमधील चाबहार प्रकल्पासाठी मालाची खेप पाठवली. या खेपेत क्रेनसारखी अवजड उपकरणे आहेत. या कृतीतून भारताने सामरिक आणि आंतरराष्टीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठीची आपली सिद्धता प्रकट केली आहे. या प्रकल्पामुळे भारताला मध्य आशियातील बाजारपेठांपर्यंत सहज पोहोचता येईल.
या खेपेत बंदरांवर वापरण्यात येणाऱ्या १४० टनाच्या दोन क्रेन्स आहेत. ज्या इटलग्रू एसआरएल या इटालियन कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
“पहिल्या खेपेत $८.५ दशलक्षची अवजड उपकरणे चाबहारला पोहोचली आहेत. यातून पोर्ट अँड मॅरिटाईम ऑरगनायझेशन आणि भारत यांच्यातील कराराला चालना मिळाली आहे.” असे विधान इराणच्या सीस्तान-बलुचिस्तान प्रांतातील जलवाहतूक विभागाचे अधिकारी बेहरौझ अघाई यांनी केले.
अघाई यांनी तेहरान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, ही अवजड उपकरणे शहीद बेहेश्ती टर्मिनलवर लावण्यात येतील. हे टर्मिनल भारत वापरणार आहे.
हिंदुस्थान टाईम्सने गेल्या महिन्यात असे सांगितले होते की जानेवारी महिन्यात या क्रेन्स पाठवण्यात येतील. ही माहिती भारताने चिनी कंपनी शांघाय झेन्हुआ हेवी इंडस्ट्रीजशी $३० दशलक्षचे क्रेन्सचे कंत्राट रद्द केल्या नंतर काही महिन्यांनी प्रसिद्ध केली होती. क्रेन्स पुरवण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे हे कंत्राट भारताने रद्द केले होते.
२०१६ मध्ये भारत आणि इराण दरम्यान चाबहार बंदर विकसित करण्याचा करार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घटना आहे.