५० किंवा त्याहून अधिक ओलिसांच्या सुटकेच्या अटीवर अखेर इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान पाच दिवसांच्या युद्धविरामावर एकमत झाले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सध्याचा करार झाला असल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. सहा पानी करारानुसार, प्रत्येक २४ तासांनी छोट्या छोट्या गटांतून ओलिसांची सुटका केली जाईल. त्यामुळे सध्या इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेल्या जमिनीवरील लढाईला विराम दिला जाईल.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलविरोधात केलेल्या हल्ल्यानंतर सुमारे २४० पॅलिस्टिनी नागरिकांना ओलिस ठेवण्यात आल्याचे वृत्त याआधी आले होते. मात्र आता अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका बजावलेल्या या करारानुसार, नेमक्या किती ओलिसांची सुटका होईल, हे स्पष्ट झालेले नाही. पाच दिवसांच्या युद्धविरामादरम्यान जमिनीवरील सर्व हालचालींवर आकाशातून नजर ठेवली जाणार आहे.
हे ही वाचा:
बीएआरसी वसाहतीत शीतपेय पाजून विद्यार्थीनीवर बलात्कार
भारताने लष्कर मागे घ्यावे, मालदीवने केली विनंती
उत्तरकाशीत मजुरांना बाहेर काढण्याचा परदेशी तज्ज्ञ, सहा पथके
‘डीपफेक व्हिडीओ’बाबत मोदी सरकार कठोर
गाझामधील या लढाईला तात्पुरता विराम मिळाल्यास इजिप्तमार्गे इंधनासह अन्य मानवतावादी मदतही देणे सोयीचे होणार आहे. येत्या काही दिवसांत ओलिसांची सुटका आणि पाच दिवसांच्या युद्धविरामाला सुरुवात होईल. मात्र वॉशिंग्टनमधील इस्रायल दूतावासातील प्रवक्त्याने ओलिसांची परिस्थिती आणि या करारावर भाष्य करण्यास नकार दिला.
इस्रायल, अमेरिका आणि हमास यांच्यात दोहा येथे चर्चा झाली. तसेच, यामध्ये कतारच्या प्रतिनिधींनी मध्यस्थांची भूमिका बजावल्याचे वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू हे गेल्या काही दिवसांपासून ५० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविरामाच्या विरोधात होते. त्यांनी आधी सर्व ओलिसांची सुटका केल्यावरच युद्धविराम केला जाईल, अशी ठाम भूमिका घेतली होती.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० जण ठार झाले होते. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात सुमारे १२ हजार ३०० जणांना जीव गमवावा लागला आहे.