इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; ओलिसांची होणार सुटका

भारताकडूनही निर्णयाचे स्वागत

इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम; ओलिसांची होणार सुटका

इस्रायल आणि हमास यांच्यातील १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवून इस्रायलने युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. कतारची राजधानी दोहा येथे अनेक आठवड्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक करारानुसार, युद्ध सहा आठवड्यांसाठी थांबवले जाणार आहे. यानंतर संपूर्ण युद्धबंदीवर चर्चा केली जाईल. युद्धबंदीच्या निर्णयाचे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांकडून (युएन) स्वागत करण्यात येत आहे.

युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, “गाझामध्ये युद्धविराम आणि ओलिसांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी कराराच्या घोषणेचे मी स्वागत करतो.” तसेच त्यांनी इजिप्त, कतार आणि अमेरिका या करारामध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. ओबामांनी एक्स अकाऊंटच्या माध्यमातून पोस्ट करत लिहिले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यात जाहीर झालेला युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी झालेला करार ही चांगली बातमी आहे. ओलिस ठेवण्यात आलेल्यांच्या कुटुंबीयांना, पॅलेस्टिनी नागरिकांना ज्यांनी एक वर्षाहून अधिक काळ त्रास सहन केला आहे आणि ज्यांनी या भयानक अध्यायाच्या समाप्तीसाठी प्रार्थना केली आहे त्या सर्वांना हा करार म्हणजे सकारात्मक पाऊल आहे.

हे ही वाचा:

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी; दोन उपग्रह अंतराळात जोडले

महाकुंभ मेळा: १० देशांची २१ सदस्यीय टीम त्रिवेणी संगमात करणार स्नान

अदानींवर आरोप करणाऱ्या हिंडेंनबर्गला टाळे!

भारताने गुरूवारी (१६ जानेवारी) इस्रायल आणि हमास यांच्यात नुकत्याच घोषित केलेल्या युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेच्या कराराला पाठिंबा दर्शविला, आणि परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आशा व्यक्त केली की या करारामुळे गाझामधील मानवतावादी परिस्थितीत सुधारणा होईल आणि मदतीचा पुरवठा होईल. “आम्ही ओलिसांच्या सुटकेसाठी आणि गाझामध्ये युद्धविराम करण्याच्या कराराच्या घोषणेचे स्वागत करतो,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version