सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठकीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाच्या या संकटकाळात काळात १२वी परीक्षांचे काय होणार हा प्रश्न होता. एकीकडे या परीक्षा घ्यायला हव्यात असा सूर होता तर या परीक्षा या कठीण परिस्थितीत कशा घेता येतील, असाही एक मतप्रवाह होता. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी परीक्षेसंदर्भात सादरीकरण केले. त्यानंतर पंतप्रधानांनी हा निर्णय घोषित केला.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यानंतर हिंदू साम्राज्य झाले असते तर आज देश जगात सर्वश्रेष्ठ ठरला असता
मराठा आरक्षणासाठी, आघाडीतील आमदारांनी राजीनामे द्यावेत
या बैठकीनंतर प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद केले होते की, कोरोनामुळे जी गंभीर परिस्थिती आहे ती पाहता १२वीची परीक्षा आयोजित करणे कठीण आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षांचे आयोजन होऊ शकत नाही.
पंतप्रधानांनी हा निर्णय घेण्यामागे भूमिका होती की, कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षावर बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यावरही त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. ही घालमेल थांबणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात १२वी परीक्षांचे काय होणार?
केंद्र सरकारने एकीकडे सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षांचे काय होणार हा प्रश्न कायम आहे. महाराष्ट्रात १०वीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. पण १२वीच्या परीक्षा घेण्याचे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ठरविले होते. आता केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील १२वीच्या परीक्षांचे काय होईल, याबद्दल विद्यार्थी आणि पालकांत उत्सुकता आहे.