खलिस्तानी समर्थकांनी काही वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना मारेकरी संबोधणारे पोस्टर व्हायरल केल्यानंतर भारतीय वंशाच्या कॅनडातील खासदारांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘या व्यक्ती म्हणजे आपल्या परसातील साप असून ते फुत्कारू लागले आहेत. ते कधीही दंश करू शकतात,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. मूळचे कर्नाटकचे असणारे चंद्रा आर्या हे ओंटारिया प्रांतातील नेपीअन मतदारसंघाचे लिबरल पक्षाचे खासदार आहेत.
८ जुलै रोजी होणाऱ्या तथाकथित ‘खलिस्तान फ्रीडम रॅली’चे पोस्टर ट्वीट करून आर्य यांनी याबाबत कडक शब्दांत टीका केली. ‘हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देऊन कॅनडातील खलिस्तानींनी आपले अधिकार आणि स्वातंत्र्याच्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग करत खूप खालचा स्तर गाठला आहे. नुकत्याच झालेल्या ब्रॅम्पटन परेडमध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा देखावा करून ती हत्या साजरी करण्यात आली होती. निवडून आलेल्या अधिकाऱ्यांनी यावर काहीच टीका न केल्याने त्यांचा उत्साह आता वाढला असून ते आता उघडपणे भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचाराचे आव्हान देत आहेत,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?
शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं
वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह
या पोस्टरवर ओटावाचे भारतीय उच्चायुक्त संजयकुमार वर्मा आणि टोरोंटोच्या कौन्सुल जनरल अपूर्वा श्रीवास्तवा यांना ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या दहशतवादी गटाचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याचे मारेकरी संबोधले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतामध्येही असंतोष पसरला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही कॅनडाला इशारा दिला आहे. ‘कॅनडाने खलिस्तानींना मोकळीक दिल्यास भारत आणि कॅनडाच्या संबंधांवर परिणाम होतील,’ असे त्यांनी म्हटले आहे.