ट्रुडो यांना मंत्र्याकडून घरचा आहेर; खलिस्तानी चळवळीची करून दिली आठवण

दोन्ही देशांमध्ये तणाव

ट्रुडो यांना मंत्र्याकडून घरचा आहेर; खलिस्तानी चळवळीची करून दिली आठवण

खालिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केल्यावर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम कॅनडातील भारतीयांवर पडताना दिसत आहे. तसेच जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारमधील मंत्र्यांनीचं आता ट्रुडो यांनी कानउघडणी करत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारमधील खासदार चंद्रा आर्या यांनी देशातील हिंदूंबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॅनडातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि त्यासाठी ट्रुडो यांचे सरकारच जबाबदार असल्याचं ते म्हणाले. ट्रुडो सरकारने कट्टरतावादी लोकांवर कारवाई केली नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं लिबरल पार्टीचे खासदार चंद्रा आर्या म्हणाले.

पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची काळजी वाटत असून कॅनडातील हिंदूची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. कॅनडामध्ये हिंदूंना धोका निर्माण झालाय, असंही चंद्रा म्हणालेत.

खलिस्तानी चळवळीचा इतिहास हा हिंसक आणि रक्तरंजित आहे. खलिस्तानी चळवळीत इतिहासात हजारो हिंदू आणि शीखांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडिया बॉम्बिंगमध्येही कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांचा पूर्ण सहभाग होता. यातील दहशतवाद्यांना आजही कॅनडातील काही भागात पुजलं जातं, असं चंद्रा म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये एक मिरवणूक काढण्यात आली होती. यात, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना रक्ताच्या थारोळ्यात दाखवण्यात आलं होतं. गांधी यांच्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर बंदूक रोखल्या होत्या. अशा देखाव्याला कोणता देश अशी परवानगी देतो. अभिव्यक्ती स्वातत्र्यांच्या नावाखाली असं कसं सुरु ठेवू शकता, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

मुंबईत दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनात यंदा २३ टक्के वाढ

निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !

खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने कॅनडातील हिंदूंना जगासमोर धमकी दिली. हिंदूंना कॅनडा सोडून भारतात जाण्यास सांगितले. त्याला कोणीही रोखलं नाही. सगळं उघड घडलं आहे, असं चंद्रा आर्या यांनी म्हटलं.

कॅनडातील हिंदू लोकांना कट्टरतावाद्यांकडून धमकी मिळत आहे. त्यामुळे येथील हिंदूंची काळजी वाटते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version