कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

खलिस्तानी कारवायांविरुद्ध आवाज उठवला म्हणून इशारा

कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडातील हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करून कॅनडामधील भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्र आर्य यांना धमकी दिली आहे. आर्य यांनी कॅनडा सोडून मायदेशी निघून जावे असा इशारा दिला आहे. चंद्र आर्य हे हिंदू कॅनडियन खासदार असून कॅनडातील खलिस्तानी लोकांद्वारे सुरू असलेल्या मंदिरांची विटंबना आणि इतर हिंसक कृत्यांविरोधात आवाज उठवत आहेत.

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की “चंद्र आर्य आणि त्यांच्या समर्थकांसाठी कॅनडामध्ये जागा नाही. त्यांनी मायदेशी परत जावं. चंद्र आर्य कॅनडात भारताचा अजेंडा राबवत आहेत, भारत सरकारचा प्रचार करत आहेत. त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतात परत जावं. चंद्र आर्य आणि त्यांचे समर्थक खलिस्तान समर्थकांविरोधात काम करत आहेत. कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी शिखांनी त्यांची कॅनडाप्रती असलेली देशभक्ती सिद्ध केली आहे. आम्ही कॅनडाप्रती निष्ठावंत आहोत.”

चंद्र आर्य हे कॅनडामधील हिंदू खासदार आहेत. ते सातत्याने कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आवाज उठवत आहेत. कॅनडाच्या संसदेपासून इतर राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवरून ते खलिस्तानी दहशतवादाविरोधात बोलत आहेत, भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवायांवर बोलत आहेत. चंद्र आर्य हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार आहेत.

हे ही वाचा:

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे मुंबईतील तलावांसह धरणात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आता मविआच्या प्रचारासाठी सज्ज

राज्यात रेल्वेसाठी तब्बल १५ हजार ९४० कोटींची तरतूद

प्रत्युत्तर म्हणून चंद्र आर्य पोस्ट करत म्हटले आहे की, “एडमंटनमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड आणि कॅनडातील खलिस्तान समर्थकांकडून द्वेष आणि हिंसाचाराच्या इतर कृत्यांचा माझ्या निषेधाला प्रतिसाद म्हणून, सीख फॉर जस्टीसचे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मला आणि माझ्या हिंदू-कॅनेडियन मित्रांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. आम्ही हिंदू जगाच्या कानाकोपऱ्यातून कॅनडामध्ये आलो आहोत. दक्षिण आशियातील प्रत्येक देशातून, आफ्रिका आणि कॅरिबियनमधील अनेक देश आणि जगातील इतर अनेक भागांतून आपण इथे आलो आहोत आणि कॅनडा ही आपली भूमी आहे. कॅनडाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आम्ही खूप सकारात्मक आणि उत्पादक योगदान दिले आहे. आमची जमीन खलिस्तानी अतिरेक्यांनी प्रदूषित केली आहे आणि आमच्या कॅनेडियन सनदी अधिकारांनी दिलेल्या आमच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत.”

Exit mobile version