कॅनडातील स्वामी नारायण मंदिरावर खलिस्तानी हल्ला

ताेडफाेडीनंतर भिंतीवर लिहिल्या घाेषणा

कॅनडातील स्वामी नारायण मंदिरावर खलिस्तानी हल्ला

कॅनडातील टोरंटो येथील भव्य अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण मंदिराची समाजकंटकांनी तोडफोड केली. अराजकवाद्यांनी मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणाही लिहून पळ काढला. या संदर्भात व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये खलिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा भिंतींवर लिहिलेल्या दिसत आहेत. अशा स्थितीत हे खलिस्तान समर्थकांचे काम मानले जात असले तरी, यापूर्वी पाकिस्तानातून खलिस्तानच्या नावाने ऑनलाइन अराजकता समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे षडयंत्र मानले जात आहे.

या घटनेबद्दल ब्रॅम्प्टन साऊथच्या खासदार सोनिया सिद्धू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आम्ही एका बहुसांस्कृतिक आणि बहु-धार्मिक समुदायात राहतो जिथे प्रत्येकजण सुरक्षित अनुभवण्यास पात्र आहे असं त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

ब्रॅम्प्टनचे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी ट्विट करून अशा प्रकारच्या द्वेषाला कॅनडामध्ये स्थान नाही या शब्दात या हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

हिंदू समाजाचा संताप

या घटनेनंतर कॅनडातील हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वामी नारायण मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिल्याबद्दल भारताच्या वतीने तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी देखील स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीचा निषेध केला आहे. भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करून तोडफोड आणि भारतविरोधी घोषणा लिहिणे निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली आहे. ही नवीन घटना नाही. याआधीही इतर मंदिरांचे नुकसान करण्याचे प्रयत्न झाले असल्याचं भारतीय वंशाचे कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी सांगितलं.

Exit mobile version