भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध ताणले असतानाच आता कॅनडाने नरमाईची भूमिका घेतली आहे. कॅनडाच्या दूतावासातील ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवावे, असे भारताने कॅनडा सरकारला बजावल्याची चर्चा आहे. त्यानंतर कॅनडाने भारतासोबतचा राजनैतिक पेच सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये खासगी चर्चा करण्याचे सुचवले आहे.
भारताने कॅनडाच्या दूतावासातील ४१ अधिकाऱ्यांना मायदेशी बोलवावे, अशी कथित सूचना केल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलेनी जोली यांनी राजनैतिक पेच सोडवण्यासाठी कॅनडा सरकार भारत सरकारशी खासगी चर्चा करू इच्छित आहे, असे म्हटले आहे.
‘आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्ही कॅनडाच्या दूतावासातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहतो. तसेच, हा पेच सोडवण्यासाठी खासगी चर्चेला आमचे प्राधान्य असेल. कारण राजनैतिक संभाषणे खासगी राहिल्यास ती सर्वोत्तम असतात,’ असे कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पुण्याच्या पालकमंत्री पदी उपमुख्यमंत्री अजित पवार!
देवरिया नरसंहारातील आरोपींविरोधात बुलडोझर कारवाईची तयारी
आपचे खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
मंगळवारी भारताने १० ऑक्टोबरपर्यंत अंदाजे ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावण्याची सूचना कॅनडा सरकारला केली असल्याचे बोलले जाते. ही मुदत उलटल्यानंतर देशात राहणाऱ्या कोणत्याही कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्याचे राजनैतिक संरक्षण काढून घेण्याची धमकीही सरकारने दिली आहे, अशी चर्चा आहे.‘फायनान्शिअल टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने कॅनडाला त्यांचे राजनैतिक अधिकारी कमी करण्याची विनंती केली आहे. सध्या भारतात कॅनडाचे ६२ राजनैतिक अधिकारी आहेत.
तथापि, आत्तापर्यंत भारत किंवा कॅनडाने या वृत्तावर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. हे वृत्त येते ना येते तोच मंगळवारी आणखी एका घडामोड झाली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतासोबतची परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी कॅनडा सरकार प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. ‘कॅनडाचे सरकार भारत सरकारशी जबाबदारीने आणि रचनात्मकपणे संलग्न राहील,’ अशी ग्वाही ट्रुडो यांनी दिली.