कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम

कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन केला आरोप

कॅनडा पोलिसांचा गंभीर दावा; भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत करतात काम

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला होता. कॅनडाचे हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुन्हा एकदा कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांच सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यानंतर भारताने कॅनडाच्या आरोपांना तथ्यहीन म्हणत कॅनडाला फटकारले आहे. अशातच आता कॅनडातील पोलिसांनी भारतावर गंभीर आरोप केला आहे.

कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत भारतात बोलावले आहे. यानंतर कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय गुप्तहेर लॉरेन्स बिश्नोई गँगबरोबर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. कॅनडातील भारतीय गुप्तहेर खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत, असे कॅनडा पोलिसांचे म्हणणं आहे. मात्र, याबाबत त्यांनी याबाबत कोणतेही पुरावे दिले नाहीत.

ओटावा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅनडा पोलिसांच्या उपायुक्त ब्रिजिट गौबिन म्हणाल्या, “कॅनडामध्ये संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर आपण पाहत आहोत. यामागे एका संघटित गुन्हेगारी टोळीचा हात आहे. विशेष करून बिश्नोई गँग जी भारतीय गुप्तहेरांशी जोडलेली आहे.” यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना विचारले गेले की, भारत सरकारचे गुप्तहेर हत्या, खंडणी, धमकावणे आणि बळजबरी करण्यासारख्या कामात गुंतले आहेत का? यावर उपायुक्त ब्रिजिट गौबिन यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. भारताने राजनैतिक अधिकारी माघारी बोलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रुडो यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कॅनाडाचा पंतप्रधान या नात्याने देशातील सर्वांची सुरक्षा माझे प्रथम कर्तव्य आहे. आमच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला जी पावले उचलावी लागतील ती उचलू.

हे ही वाचा:

यूपी, आसाममध्ये मदरशांना कुलूप, महाराष्ट्रात टॉनिक! |

जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड!

मूकबधिरांना आत्मनिर्भर करणाऱ्या ‘टीच’ संस्थेच्या अमन शर्मांना केशवसृष्टी पुरस्कार

बाबा सिद्दिकी यांच्यासोबत झीशान सिद्दिकीही होते टार्गेटवर

भारताने सोमवारी आपले उच्चायुक्त, इतर मुत्सद्दी आणि अधिकारी यांना परत बोलावण्याची घोषणा केली. कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांना लक्ष्य केलं जात असल्याने त्यांना परत भारतात बोलावले आहे. यासोबतच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांना १९ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्यास सांगितले आहे. शीख फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येच्या तपासात कॅनडाने संजय वर्मा यांचा उल्लेख केल्याने भारताने ही कारवाई केली आहे.

Exit mobile version