मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?

गेल्या वर्षी कतारमध्ये अटक झालेल्या भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाणार आहे. कतारच्या न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेबाबत भारताकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. तसेच, भारतीयांच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे कायदेशीर पर्याय चाचपडून पाहिले जात आहेत.

भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना गेल्या वर्षी हेरगिरीच्या आरोपाखाली कतारमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने कतार न्यायालयाच्या विस्तृत निकालाची आपण वाट पाहात आहोत, असे सांगून भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सर्व प्रकारचे कायदेशीर पर्याय पाहिले जात असल्याचे जाहीर केले होते.

आता भारतापुढे काय मार्ग आहेत, यावर काही कायदेतज्ज्ञांनी मते मांडली आहेत. ‘आंतरराष्ट्रीय कायदा आणि आयसीसीपीआर अंतर्गत काही बाबी सोडल्यास सर्वसाधारणपणे फाशीची शिक्षा दिली जात नाही,’ अशी माहिती देत वरिष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांनी भारतापुढे अन्य मार्गही खुले आहेत, असे त्यांनी सांगितले.

‘पहिला पर्याय म्हणजे भारत या निर्णयाविरोधात कतारच्याच उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. जर योग्य प्रक्रियेचा वापर केला जात नसेल अथवा अपीलावर सुनावणी होत नसेल तर भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू शकतो,’ अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच, मृत्युदंडाची शिक्षा रोखण्यासाठी भारत राजनैतिक दबावही आणू शकतो, असेही ग्रोव्हर म्हणाले. इतकेच नव्हे तर स्वयंसेवी संस्था आणि सिव्हिल सोसायटीदेखील हा मुद्दा जागतिक स्तरावर मांडू शकतात. संयुक्त राष्ट्राकडे धाव घेण्याचा पर्यायही भारतासमोर आहे.

हे ही वाचा:

‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’

हमासच्या चुकीचा फटका गाझातील पत्रकाराला बसला; इस्रायलच्या बॉम्बवर्षावात कुटुंब मृत्युमुखी

कतारने ठोठावली भारतीय नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा!

या माजी नौदल अधिकाऱ्यांवर कथितरीत्या इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कतारच्या पाणबुडी प्रकल्पाशी संबंधित काही माहिती त्यांनी इस्रायलला दिली, असा आरोप त्यांच्यावर आहे.

Exit mobile version