गाझामध्ये युद्धबंदीची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाविरोधात अमेरिकेकडून नकाराधिकारसंयुक्त अरब अमिरातीने मांडलेल्या संक्षिप्त मसुद्याच्या ठरावाच्या बाजूने १३ देशांचे मतदान; ब्रिटन अलिप्त
गाझामध्ये तात्काळ मानवतावादी युद्धविरामाची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सुरक्षा परिषदेच्या बहुसंख्य सदस्यांनी आणि इतर अनेक राष्ट्रांनी पाठिंबा दिला होता. मात्र अमेरिकेने शुक्रवारी या ठरावाविरोधात नकाराधिकाराचा (व्हेटो) वापर केला. संयुक्त अरब अमिरातीने मांडलेल्या संक्षिप्त मसुद्याच्या ठरावाच्या बाजूने १३ सदस्यांनी मतदान केले, तर ब्रिटन मतदानापासून दूर राहिले.
नकाराधिकाराचा वापर केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या उपराजदूतांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेवर टीका केली. ‘लष्करी कारवाई थांबवल्यास हमासला पुन्हा त्यांच्या कारवाया करण्यास मोकळीक मिळेल आणि त्यामुळे केवळ पुढील युद्धाची बीजे रोवली जातील,’असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, इस्रायलमधील हल्ल्याप्रकरणी हमासचा निषेध करण्यात आणि इस्रायलचा स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार मान्य न केल्याबद्दल त्यांनी सुरक्षा परिषदेवर टीकाही केली.
‘इस्रायली आणि पॅलेस्टिनी दोघेही शांततेत आणि सुरक्षेने जगू शकतील, अशा एका शाश्वत शांततेच्या बाजूचे अमेरिका जोरदार समर्थन करते. परंतु पुढील युद्धाची बीजे रोवली जातील, अशा ठरावाच्या आवाहनाचे आम्ही समर्थन करू शकत नाही,’ असे अमेरिकेच्या उपराजदूतांनी स्पष्ट केले.
मतदानानंतर एका निवेदनात, इस्रायलचे संयुक्त राष्ट्राचे राजदूत गिलाड एर्डन यांनी ‘सर्व ओलीस परत आल्यावर आणि हमासचा नाश करूनच युद्धविराम शक्य होईल,’ या देशाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
बहुसंख्य राष्ट्रांनी गाझावरील इस्रायली बॉम्बफेक त्वरित थांबवण्याच्या बाजूने भूमिका घेतली. पॅलेस्टाइनसाठी संयुक्त राष्ट्राचे दूत रियाद मन्सूर यांनी मतदानाचा निकाल ‘विनाशकारी’ होता, अशी प्रतिक्रिया दिली. तर, यूएईचे संयुक्त राष्ट्रांचे राजदूत मोहम्मद अबूशहाब यांनीही सुरक्षा परिषदेला विचारले की, जर आम्ही गाझावरील अथक बॉम्बफेक थांबवण्याच्या आवाहनासाठी एकत्र येऊ शकत नसलो तर आम्ही पॅलेस्टिनींना काय संदेश पाठवत आहोत?,’ असा प्रश्न उपस्थित केला.
हे ही वाचा:
आदित्य एल-१ने काढली सूर्याची पहिलीवहिली छायाचित्रे
कोणताही प्रशिक्षक शमीसारखा गोलंदाज तयार करू शकत नाही!
पासपोर्टसाठी महिला पोलीस ठाण्यात आली, इन्स्पेक्टरने चुकून डोक्यात गोळी झाडली!
नरेंद्र मोदी जगभरातील सर्वांत लोकप्रिय नेते
मतदानापूर्वी, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेला दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे होणाऱ्या जागतिक धोक्याचा इशारा दिला.
हमासकडूनही नकाराधिकाराचा निषेध
पॅलेस्टिनी गट हमासने या ठरावाविरोधात नकाराधिकाराचा वापर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा निषेध केला. अमेरिकेचे पाऊल अनैतिक आणि अमानवीय असल्याचे त्यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले. हमासच्या राजकीय ब्युरोचे सदस्य, एज्जत अल-रेशिक म्हणाले, ‘युद्धविराम ठराव मंजूर करण्यात अमेरिकेने अडसर निर्माण करणे म्हणजे आमच्या माणसांना मारण्यात आणि अधिक नरसंहार व वांशिक निर्मूलन करण्याच्या कारवायांत थेट सहभाग घेण्यासारखे आहे.’