ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जॉन्सन यांनी एका व्हिडिओ मेसेजद्वारे या शुभेच्छा दिल्या आहेत. बोरिस जॉन्सन या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. पण ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्यामुळे त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी आपला भारत दौरा रद्द केला.
आज भारत प्रजासत्ताक दिन आणि असामान्य संविधानाचा जन्म साजरा करत आहे, ज्यामुळे जगातील सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र उदयास आले, माझ्या हृदया जवळच्या देशाला मी शुभेच्छा देतो असे जॉन्सन यांनी म्हंटले आहे. आपल्या शुभेच्छा संदेशात जॉन्सन यांनी कोविड लसीसाठी भारत आणि ब्रिटन यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. “दोन्ही देश (भारत आणि ब्रिटन) कोविड लस विकसित करणे, त्याची निर्मिती करणे, आणि वितरण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत ज्यामुळे मानवतेला या महामारीपासून मुक्त करण्यास मदत होईल.” असे जॉन्सन म्हणाले. भारत, ब्रिटन आणि इतर अनेक देशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण कोविड विरोधात यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत असाही उल्लेख त्यांनी केला.
भारत आणि ब्रिटनची मैत्री अधिक सुदृढ करण्यासाठी लवकरच आपण भारत दौरा करणार आहोत असेही बोरिस जॉन्सन यांनी सांगितले आहे.