इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला

२०० ठिकाणी इस्रायलच्या सैन्याकडून बॉम्बचा वर्षाव

इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला

इस्रायल आणि हमासमधील युद्धाची तीव्रता अधिक वाढत असून हा संघर्ष चिघळला आहे. हमासने शनिवारी इस्रायलवर रॉकेट्स डागून या संघर्षाला तोंड फोडले. यानंतर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. या युद्धात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. दरम्यान, इस्रायलच्या सैन्याने बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी गाझामध्ये हमासच्या सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’च्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, इस्रायलावरील हल्ल्यात हमास सैन्य प्रमुख मोहम्मद डेईफची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे इस्रायलने थेट त्याच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला केला. त्यांच्या घरासह २०० ठिकाणी इस्रायलच्या सैन्याकडून बॉम्बचा वर्षाव करण्यात आला.

इस्रायलने तिसऱ्यांदा गाझातील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या ४५० ठिकाणांवर हल्ले केल्याचे इस्रायलच्या सैन्याने सांगितलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये इस्रायल सैन्याने म्हटलं, “इस्रायल सैन्य सातत्याने गाझावर हल्ले करत आहे. अल फुरकान भागात लढाऊ विमानांनी २०० हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. ४५० ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर इस्राय सैन्याने केलेला हा तिसरा हल्ला आहे.”

हे ही वाचा:

तुमच्या पुरुषार्थामुळे पदकांची प्रतीक्षा संपली!

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल

महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला

दरम्यान, हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २ हजार ८०० हून अधिक जण जखमी झाले. याशिवाय जवळपास ५० जण बेपत्ता असून त्यांचं अपहरण झाल्याचा संशय आहे. दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात पॅलेस्टिनमधील ७७० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

Exit mobile version