बॉलीवूडही म्हणतं, मालदीव नको आपलं लक्षद्वीप मस्त!

अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी दिली प्रतिक्रिया

बॉलीवूडही म्हणतं, मालदीव नको आपलं लक्षद्वीप मस्त!

मालदीव आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. त्यांनी आपल्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. यासोबतच त्यांनी येथे भेट देण्याचे पर्यटकांना आवाहनही केले. यावरून मालदीव आणि लक्षद्वीप यांच्यात तुलना होऊ लागली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी काही मालदीवच्या मंत्र्यांकडून करण्यात आली होती. पुढे तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे.

सोशल मीडियावर या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे सोशल मीडिया यूजर्स देखील भिडले आहेत. तसेच बॉलीवूडमधील मंडळींनीही यावर आपली मते व्यक्त करत मालदीवच्या द्वेषपूर्ण कमेंट्सवर नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मालदीवमधील प्रमुख व्यक्तींनी भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या देशातून सर्वाधिक पर्यटक येतात त्या देशाबाबतीत ते हे करत आहेत. मी अनेकवेळा मालदीवला भेट दिली आहे. नेहमीच त्यांचे कौतुक केले आहे; परंतु सन्मान प्रथम येतो. चला भारतीय बेटांचा शोध घेण्याचे ठरवूया आणि आपल्या स्वतः च्या पर्यटनाला पाठिंबा देऊया,” असे आवाहन करत अक्षय कुमारने मालदीवला सुनावले आहे.

या वादावर अभिनेता सलमान खान यानेही प्रतिक्रिया दिली आहे. “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि विस्मयकारक समुद्रकिनाऱ्यावर पाहून खूप आनंद झाला आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे.”

अभिनेता जॉन अब्राहम म्हणाला की, “आश्चर्यकारक! भारतीय आदरातिथ्यासह, ‘अतिथी देवो भव’ची कल्पना आणि विशाल सागरी जीवन. लक्षद्वीप हे पाहण्यासारखे ठिकाण आहे.” असे त्याने लक्षद्वीपचे फोटो पोस्ट करत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला. ३६ बेटांचा समावेश असलेल्या लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मोदींनी हा दौरा केल्याचे मानले जाते. या दौऱ्यादरम्यान मोदी यांनी तेथील छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती.

हे ही वाचा:

एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार

आंध्रप्रदेश: कोंबड्यांना धान्याऐवजी खायला दिले जाते वायग्रा आणि शिलाजीत!

 पाच वर्षाच्या मुलीवर ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया

ही दोस्ती तुटायची नाय!

Exit mobile version