पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे अपहरण बलुच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आले. यातील ओलिसांची सुटका झाल्यानंतर आता पाकिस्तानच्या वझिरीस्तान प्रदेशातील एका मशिदीत स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, १४ मार्च रोजी झालेल्या या स्फोटात एका स्थानिक इस्लामी नेत्यासह काही मुले तीन जण जखमी झाले आहेत.
देशाच्या वायव्य भागात असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील जमियत उलेमा इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) राजकीय पक्षाचे स्थानिक नेते अब्दुल्ला नदीम यांना लक्ष्य करून हा स्फोट घडवण्यात आला असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. दक्षिण वझिरिस्तान जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले की, नदीम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि जखमींमध्ये तीन मुले देखील आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मौलाना अब्दुल अजीज मशिदीत शुक्रवारच्या नमाज दरम्यान स्फोट झाला.
वझिरिस्तान भागात झालेल्या या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही त्यामुळे स्फोटाला कोण जबाबदार आहे हे स्पष्ट झालेले नाही. दुपारी १.४५ मिनिटांनी हा स्फोट झाला. यात जमियत उलेमा इस्लाम-फजलचे नेते अब्दुल्ला नदीम गंभीर जखमी झाले आहेत. तर, इतर तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत डॉनने वृत्त दिले आहे की, जखमींची ओळख रहमानउल्लाह, मुल्ला नूर आणि शाह बेहरन अशी झाली आहे.
हे ही वाचा :
सतीश ऊर्फ खोक्या भोसलेला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी
इंझमाम उल हक म्हणतो, आयपीएलवर बहिष्कार टाका!
बांगलादेशचे राजदूत म्हणतात, युनूस सरकारमुळे देशात अराजक, हिंदूंवर अत्याचार
मणिपूरमध्ये पोलिसांना मोठे यश, चार दहशतवाद्यांना अटक!
पाकिस्तानमध्ये मशिदींना, विशेषतः शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी, जेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी जमते तेव्हा लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात, नौशेरा जिल्ह्यातील दारुल उलूम हक्कानिया मदरसामध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटात जेयूआय-एस नेते मौलाना हमीदुल हक हक्कानी यांच्यासह सहा जण ठार झाले आणि १५ जण जखमी झाले. तर यापूर्वी ३० जानेवारी २०२३ रोजी, एका मशिदीच्या आत मोठा स्फोट झाला होता. यात ५९ लोक ठार झाले आणि १५७ जण जखमी झाले होते. पेशावरच्या रेड झोन परिसरातील मशिदीत झालेल्या स्फोटात ३०० ते ४०० लोक बहुतेक पोलिस अधिकारी नमाजसाठी जमले होते.