इस्रायल आणि हमासच्या युद्धादरम्यान सर्वाधिक होरपळ होत आहे ती गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य पॅलिस्टिनी नागरिकांची. म्हणूनच इस्रायलच्या एक दिवसाच्या भेटीवर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमधील नागरिकांसाठी मानवतावादी दृष्टिकोनातून १० कोटी अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीतील नागरिकांना अन्न, पाणी, औषधे आणि निवाऱ्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. तसेच, ही सर्व जीवनावश्यक मानवतावादी मदत गाझा पट्टीमधील सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची विनंतीही त्यांनी इस्रायली मंत्रिमंडळाकडे केली.
‘या निधीमुळे युद्धामुळे विस्थापित झालेल्या सुमारे १० लाख पॅलेस्टिनी नागरिकांना मदत मिळेल. तसेच, हा पैसा हमास किंवा अन्य दहशतवादी गटापर्यंत न पोहोचता केवळ गरजू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी आम्ही यंत्रणा उभारू,’ असे जो बायडेन यांनी गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमधील नागरिकांना १० कोटी अमेरिकी डॉलरची मदत जाहीर करताना सांगितले. तसेच, या युद्धाच्या आडून कोणीही इस्रायलवर हल्ला करण्याचा विचार करू नये, या आपल्या इशाऱ्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
हे ही वाचा:
थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी राष्ट्रपतींच्या गावी पोहचणार रेल्वे
इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट
गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
त्यांनी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याची तुलना केली. ‘आपण या हल्ल्याला इस्रायलवरील ९/११चा हल्ला असे संबोधतो आहोत. परंतु इस्रायल या राष्ट्राचा आकार बघता, हा हल्ला ९/११ हल्ल्याच्या पाचपट मोठा आहे,’ असे बायडेन म्हणाले. असे असले तरी त्यांनी या हल्ल्याचा बदला घेण्याचे कृत्य करू नये आणि युद्धाचे नितीनियम पाळावेत, असा इशारा त्यांनी इस्रायलींना दिला. बहुतांश पॅलेस्टिनी नागरिक हे हमासशी संबंधित नाहीत, यावर त्यांनी जोर दिला.