अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. जो बायडन यांनी पुतीन यांना “किलर” म्हणजेच खुनी म्हटल्यानंतर पुतीन यांनीही आता पलटवार करत, “टेक्स वन टू नो वन” म्हणजेच एखाद्याची ओळख पटण्यासाठी स्वतःही तसं असावं लागतं, अशा शब्दात पलटवार केला आहे.
जो बायडन यांनी व्लादिमिर पुतीन यांच्यावर अमेरिकेतील नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. रशियाने २०१६ साली झालेल्या निवडणुकीतही हस्तक्षेप केल्याचा आरोप गेली चार वर्षे होत आहे. तत्कालीन डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ई-मेल हॅक करून त्यांचा वापर निवडणुकांच्या निकालांवर प्रभाव पाडण्यासाठी केल्याचा आरोप अमेरिकेने रशियावर केला होता. २०२० मध्ये देखील रशियाने निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी समाज माध्यमांमधून ‘फेक न्यूज’ पसरवल्याचा आरोप केला जात आहे.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री
धारावाईक रामायणातले राम, करणार भाजपाचे काम
अजानमुळे झोपमोड होत असल्याची तक्रार
याशिवाय रशियाचे पुतीन विरोधी नेते नवालनी यांच्यावर विषप्रयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न सरकारने केल्याचाही आरोप आहे. याही प्रकरणात संशयाची सुई पुतीन यांच्याकडे वळते. या मुळेच बायडन यांनी पुतीन यांना खुनी म्हणून संबोधित केले होते. यावर आता पुतीन यांनी देखील पलटवार करत, “ते (बायडन) स्वतःही (खुनी) असल्यामुळे ते मला ओळखू शकले” अशी खोचक टीका केली आहे.
या वाकयुद्धांमुळे पुन्हा एकदा रशिया अमेरिका संबंध रसातळाला जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.