‘भूत’ हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते, काहींचा थरकाप उडतो तर काहींना घामाच्या धारा सुरु होतात. अशीच काहीशी अवस्था आता साहेबांच्या देशात म्हणजेच इंग्लंडमध्ये होणार आहे आणि ती पण एका भारतीय भूतामुळे. पण हे होणार आहे भूताला पाहून नाही तर खाऊन!
हे भूत म्हणजे दुसरं काही नसून भारतात विकली जाणारी भूत जोलोकिया ही मिरची आहे. ईशान्य भारतातील नागालँड या राज्यात तयार होणारी भूत जोलोकिया ही मिरची केवळ भारतातच नाही तर जगातली सर्वात तिखट मिरची समजली जाते. भूत जोलोकिया ही मिरची घोस्ट पेपर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या मिरचीला २००८ साली जीआय प्रमाणपत्रही मिळाले आहे. यावर्षी पहिल्यांदाच ही मिरची लंडन येथे पाठवले जात आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथून या मिरचीची पहिली खेप लंडनला पाठवण्यात आली.
हे ही वाचा:
नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले
जनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास
भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला
भारत सरकारच्या अपेडा आणि नागालँड राज्याच्या ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड यांच्या समन्वयातून या मिरचीची निर्यात करण्यात आली. नागालँडमधील टेनिंग या जिल्ह्यातील पेरेन या ठिकाणी या मिरचीचे उत्पादन करण्यात आले आहे. भूत जोलोकिया मिरची ही राजा मिरचा किंवा किंग चिली म्हणून प्रसिद्ध आहे. या मिरचीची निर्यात करणे हे सरकारसाठी एक प्रकारचे आव्हानच होते. कारण ही मिरची नाशवंत पदार्थांमध्ये गणली जाते. पण तरीही यावर मात करत या मिरचीची निर्यात करण्यात सरकारला यश आले आहे.