भारताच्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन मार्फत तयार करण्यात आलेले ‘भीम’ हे मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशन आता भूतान मध्येही वापरले जाणार आहे. मंगळवार १३ जुलै रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामगाय त्शेरिंग यांनी त्याचे अधिकृत लॉन्चिंग केले.
भारत इंटरफेस फॉर मनी अर्थात भीम हे भारताचे स्वतःचे असे मोबाईल पेमेंट ॲप्लिकेशन असून ते युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थातच यूपीआय या तंत्रज्ञान प्रणालीवर काम करते. भारतातील ई-पेमेंट व्यवहारांना चालना देण्यासाठी ३० डिसेंबर २०१६ साली हे ॲप लॉन्च करण्यात आले. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१९ साली भूतान दौऱ्यावर गेले असताना भीम हे ॲप भूतानसाठीही लॉन्च करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये मान्यता झाली होती. त्यानुसारच आता दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांनी मिळून भूतानसाठी भीम ॲप्लिकेशनचे लॉन्च केले आहे. या आधी भारतातील रूपे कार्ड हे भूतानमध्ये स्विकारले जाऊ लागले होते. त्यातच आता भीमचा पर्यायही उपलब्ध झाल्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी हे खूपच सोयीचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश
विजयी भव! पंतप्रधान साधणार भारताच्या ऑलिम्पिक चमूशी संवाद
एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली
भूतान हा भारताचा शेजारील मित्र देश असून दरवर्षी हजारो भारतीय नागरिक हे कामानिमित्ताने किंवा फिरण्यासाठी भूतानमध्ये जात असतात. दोन्ही देशांची पेमेंटची यंत्रणा एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे देशातील नागरिकांना पेमेंट करताना खूपच सोयीस्कर होणार आहे. एका बटनावर पर्यटक कॅशलेस व्यवहार करत आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू शकतात.
याप्रसंगी बोलताना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन असं म्हणाल्या की, “भारताची ‘भीम’ ही सेवा शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भूतानला प्रदान करताना आनंद आणि अभिमान वाटत आहे. डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात भीम युपीआय हे भारताने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. एकट्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीयांनी ४१ लाख कोटींचे व्यवहार हे भीम मार्फत केले आहेत. तर गेल्या पाच वर्षात १०० मिलियन पेक्षा जास्त व्यवहार हे भीमच्या माध्यमातून झाले आहेत.”