भाविना पटेलने रचला इतिहास! रौप्य पदकावर कोरले नाव

भाविना पटेलने रचला इतिहास! रौप्य पदकावर कोरले नाव

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने पदकाचे खाते उघडले आहे. भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिने रौप्य पदक पटकावत नवा इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिक मधील टेबल टेनिस क्लास ४ प्रकारात भाविनाने रौप्य पदक पटकावले आहे. महिला एकेरी प्रकाराच्या अंतिम फेरीत भाविनाचा सामना चीनच्या झाऊ हिंग हिच्या सोबत होता. पण या सामन्यात सरळ तीन सेटमध्ये भाविनाचा पराभव झाला आहे. ७-११, ५-११, ६-११ अशा प्रकारे झाऊ हिंग हिने भविनाचा पराभव केला आहे.

पण तरीही भाविनाचे रौप्यपदक जिंकणे ही अतिशय मोलाची आणि महत्वाची कामगिरी ठरली आहे. या कामगिरीसह टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये पदकांचा यादीत भारताचे खाते उघडले आहे. भाविना पटेलचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मंचावर उत्तम कामगिरी केली आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार यांचे निधन

आमदार केळकरांच्या प्रयत्नाने मिळाले ट्रॅफिक वॉर्डनचे थकीत पगार

मुघलांचे अनौरस वारसदार

धुरंधर ढेपाळले, भारताचा दारुण पराभव

भाविनाच्या या कामगिरीसाठी देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून भाविनाची पाठ थोपटली आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “भाविना पटेल हिने उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास रचला आहे. तिने एक ऐतिहासिक रौप्य पदक घरी आणले. त्यासाठी तिचे अभिनंदन. तिचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे आणि तो अधिक तरुणांना खेळांकडे आकर्षित करेल.”

Exit mobile version