कॅनडामध्ये सध्या फुटीरतावादी लोकांच्या हालचालींना पेव फुटला असून या लोकांकडून भारताविरोधी घोषणा केल्या जात आहेत. तसेच भारतीय झेंड्याचा सार्वजनिकरित्या अपमानही केला जात आहे. ग्रेटर टोरंटो भागातील ब्रॅमटन शहरात श्री भगवत गीता पार्कमध्ये लावण्यात आलेल्या संकेत चिन्हांची काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे.
शुक्रवार, १४ जुलै रोजी सकाळी या पार्कमधील चिन्हांची तोडफोड झाल्याचे लक्षात आले. तसेच काही चित्रे लावण्यात आली होती. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करणारं एक भिंतीचित्र काढण्यात आले होते. मात्र, सफाई कर्मचाऱ्यांकडून लगेच भिंतीचित्र हटवण्यात आले. यापूर्वी हिंदू धर्माची मंदिरे आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना देखील करण्यात आली होती.
ब्रॅमटन शहराच्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. “पार्कमधील संकेत चिन्हांचा अपमान झाल्याची बातमी पाहून निराशा झाली. हा एका धार्मिक समुदायावर झालेला हल्ला आहे,” असं सांगण्यात आले आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.
ब्रॅमटन शहराचे महापौर पॅट्रीक ब्राऊन यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले की, या तोडफोडीच्या घटनेमुळे ते नाराज आहेत. शहरात कोणत्याही धार्मिक समुदायाला घाबरवणे आणि धमकावण्याच्या घटनांबद्दल सहिष्णूता दाखवली जाणार नाही. कॅनडामधील भारतीय लोकांनी देखील या घटनेबद्दल आपला राग व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
फ्रान्सवरून पंतप्रधान मोदी युएईला रवाना
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर
कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!
गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून कॅनडामधील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रॅमटन शहरामध्ये भारत माता मंदिराबाहेर भारतीय राजदूतांना लक्ष्य करत काही पोस्टर्स लावण्यात आले होते.