बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम

भारताच्या अविनाश साबळेने एक नवा ‘महाविक्रम’ नोंदवला आहे. अविनाश साबळेने पाच हजार मीटरमध्ये बहादूर प्रसादचा तीस वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. महाराष्ट्रातील २७ वर्षीय अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये १३:२५.६५ च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. साबळेने या शर्यतीत बारावे स्थान पटकावले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये एक हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा नॉर्वेचा जेकब इंजेब्रिग्टसेन हा विजेता ठरला असून, त्याने १३:०२.०३ सेकंदात शर्यत पूर्ण केली आहे.

बहादूर प्रसाद यांनी १९९२ मध्ये बर्मिंगहॅम येथे १३:२९.७० सेकंदांच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रम केला होता, जो तब्बल तीस वर्षे अबाधित राहिला. त्यांनतर महाराष्ट्राच्या अविनाशने तो विक्रम मोडला आहे. अविनाश सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीच्या निमित्ताने अमेरिकेत आहे. अविनाश साबळे हा भारतीय लष्कराचे शिपाई असून ते महाराष्ट्रातील बीड येथील आहेत.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?

‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’

विलेपार्लेतील एलआयसी कार्यालयाला आग

टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन जखमी

अविनाशच्या नावावर तीन हजार मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रमही आहे. त्याने स्वतःचाच तीन हजार मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रम अनेकदा मोडला आहे. त्याने गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८:१८.१२ सेकंदाच्या वेळेसह राष्ट्रीय विक्रमही केला होता. युजीन, यूएसए येथे १५ ते २४ जुलै दरम्यान होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी यापूर्वीच तो पात्र ठरला आहे.

Exit mobile version