बिटिंग रिट्रिट सोहळ्यात साकारला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
नवी दिल्लीतील विजय चौक येथे बिटिंग रिट्रिट सोहळ्याने रंगत वाढविली. यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या २३ जानेवारीला असलेल्या जयंतीदिनापासून प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. २९ जानेवारीला बिटींग रिट्रिट या सोहळ्याने प्रजासत्ताक सोहळ्याची सांगता झाली. हा सांगता सोहळा रंगतदार, अविस्मरणीय, विलक्षण होता. आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तब्बल १००० ड्रोन्सच्या सहाय्याने आकाशात साकारलेले विविध आविष्कार देशवासियांच्या कौतुकास पात्र ठरले.
त्याआधी, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत बँड पथकाने वाजविलेल्या ड्रम्सनी सारा परिसर दणाणून गेला. ड्रम्स स्टिक्स एकमेकांवर आपटून एक वेगळी लय त्यांनी पकडली. एका वेगळ्या थाटात हात वरखाली घेत वाजविलेल्या ड्रम्सबिटवर उपस्थित डोलू लागले.
त्यानंतर बँड पथकाने ‘ए मेरे वतन के लोगो’ या प्रसिद्ध गाण्याचे बोल गुंजले. प्रतिवर्षी या कार्यक्रमात वाजविले जाणारे अबाईड विथ मी हे गीत वगळण्यात आल्यानंतर त्याजागी ए मेरे वतन के लोगो हे गाणे समाविष्ट करण्यात आले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेले, सी. रामचंद्र यांचे संगीत असलेले आणि कवी प्रदीप यांचे हे गीत विशेषत्वाने निवडण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.
ए मेरे वतन के लोगो या गीतातील जय हिंद की सेना हे सूर गुंजले आणि तमाम उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात बँडपथकाचे कौतुक केले. त्यानंतर भारतीय तिरंगा खाली उतरविण्यात आला.
यानंतर बँड पथक रवाना झाले. त्यांनी राष्ट्रपतींकडून परवानगी मागितली आणि सारे जहाँ से अच्छाच्या सुरांवर बँडपथक परतले.
यानंतर विजय चौकातील इमारतींवर लेझर किरणांच्या सहाय्याने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अत्यंत मोहक पद्धतीने साकारण्यात आला. वीर जवानांचा त्याग, त्यांची देशभक्ती याचे चित्रण या लेझर किरणांद्वारे करण्यात आले. ‘ये भारत केवल देश नही भारत अपनी माता है, हिंदोस्ता केवल मुल्क नही, ये उन्नत अपना माथा है’ अशा शब्दांच्या पार्श्वभूमीवर या इमारती रंगांनी न्हाऊन निघाल्या. वेद पुराण, श्रुती, स्मृतींचा उल्लेख केला गेला. साधु ऋषींच्या प्राचीन भारताची दखल घेतली गेली. मंदिर, मशीद, अग्यारी, गिरिजाघर यांची चित्रे साकारली. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाची कहाणी आणि त्यातील क्रांतिकारकांचे योगदान देखील त्या भिंतींवर साकारले. नव्या भारताची वाटचालही त्यावर प्रकाशमान झाली. ७५ वर्षांत देश कुठे पोहोचला त्याचेही दर्शन झाले.
हे ही वाचा:
परीक्षा घोटाळा प्रकरणी कृषी अधिकारी सुशील खोडवेकर अटकेत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील वाद चव्हाट्यावर
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
लावण्याला न्याय द्यायला सरसावला बालहक्क आयोग
ड्रोन्सनी केली कमाल
दिल्ली आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी स्टार्टअपच्या माध्यमातून तयार केलेल्या १००० ड्रोन्सनी आकाश व्यापले. ड्रोन्सच्या सहाय्याने आकाशात तिरंग्यातील रंग तयार झाले. नंतर पृथ्वीगोल याच ड्रोन्सच्या सहाय्याने तयार करण्यात आला.
भारताचा नकाशाही आकाशात तयार झाला. गांधींचे चित्रही साकारले. हातात काठी घेतलेले गांधीजी दिसले. युद्ध स्मारकाचे चित्रही तयार करण्यात आले. मेक इन इंडियाचा सिंह साकारण्यात आला. ७५ वर्षांचा स्वातंत्र्यमहोत्सवाचे बोधचिन्ह आकाशात चमकू लागले. राष्ट्रध्वज तयार केला गेला. नंतर वंदे मातरमचा आवाज घुमला. वंदे मातरम गीताच्या तालावर ते ड्रोन खाली आले.