कोरोनाच्या लॉकडाउन काळात शहरांतील अनेक भागात जंगलातील विविध प्राणी आढळून येऊ लागले आहेत. बिबट्यांचा वावरही असाच वाढला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असणाऱ्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील एका इमारतीच्या आवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक १९ गार्डन हिल सोसायटीच्या आवारात रात्री २ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान बिबटा दिसला. इमारतीचे सुरक्षा रक्षक सुनील सरोज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी इमारतीचे सचिव युवराज गायकवाड, अध्यक्ष रणजीत कदम आणि रहिवासी जतीन बजाज, गणेश कदम यांना फोन करून त्वरित सोसायटी आवारात बोलावून घेतले. बिबट्या श्वानांच्या वासाने न्यू म्हाडा वसाहतीत येत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी या प्रकरणाची दखल घेऊन येथील बिबट्याच्या वावरावर ठोस कारवाई करण्यासठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात पिंजरे लावण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने परिसरातील डोंगरात भरणी करून रस्ता तयार केला आहे. रस्ता तयार केल्यामुळे बिबट्या इमारतीच्या आवारात येऊ लागला आहे.
हे ही वाचा:
भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
फेलिक्सने दाखवून दिली प्रायोजकांना त्यांची ‘जागा’
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम व्यावसायिक आणि वन विभागाने येथे संरक्षित भिंत बांधावी आणि तारेचे कुंपण घालण्यासाठीही आमदार प्रभू यांनी वन विभागाकडे पाठपुरावा करावा. तसेच परिसरातील श्वानांना खाद्य देणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवराज गायकवाड यांनी केली आहे.
नॅशनल पार्क लगतच्या परिसरात आणि आजूबाजूच्या इमारतींच्या आवारात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. जंगलामधील वाढत्या बांधकामामुळे बिबट्याचा वावर वस्तीमध्ये वाढला आहे. वन विभागाने बांधकामांना वन क्षेत्रात परवानगी देऊ नये म्हणून पर्यावरण संघटनांनी अनेकदा आंदोलनेही केली आहेत. तरीही बांधकामे सुरूच आहेत. भटक्या श्वानांचा अधिक वावर होऊ देऊ नका, बिबट्या त्यांची सहज शिकार करतो असेही आवाहन करण्यात आले आहे.