बीसीसीआयने शिक्षेतून मुक्त केल्याचे पत्र दिले
न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह
डावखुरा फिरकी गोलंदाज आणि मुंबईचा क्रिकेटपटू अंकित चव्हाणने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर घालण्यात आलेल्या बंदीतून मुक्त केले आहे.
आठ वर्षांपूर्वी अंकितवर या स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी सात वर्षांच्या शिक्षेत परावर्तित झाली. गेल्या महिन्यात बीसीसीआयचे लोकायुक्त डी. के. जैन यांनी ही बंदी सात वर्षांची केल्याचे आदेश दिले. त्याच्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला सात वर्षे झालेली असल्यामुळे आपोआपच त्याच्या बंदीचा कालावधी संपुष्टात आला. त्याला बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा होती. बीसीसीआयकडून मंगळवारी संध्याकाळी त्याला तसे रितसर पत्र मिळाले आणि क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा पाऊल ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला.
हे ही वाचा:
प्रतिज्ञापत्र सादर करा! सरकारच्या शुल्क नियंत्रण समितीला कोर्टाचा आदेश
…तर आषाढी एकादशीला उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही
एरिक्सन पुन्हा उभा राहतोय! चाहत्यांचे मानले आभार
शासकीय कर्मचारी होणार रिक्षावाले?
यासंदर्भात ‘न्यूज डंका’शी बोलताना तो म्हणाला की, मी खूपच समाधानी आहे आणि मोठे दडपण दूर झाले आहे. माझ्या कुटुंबियांवरील दडपणही नष्ट झाले आहे. गेली ८ वर्षे एक महिन्याचा संघर्ष आता संपला आहे. या कोरोनाचा काळ संपला की, पुन्हा मैदानावर उतरण्याची इच्छा आहे.
अंकितने सांगितले की, गेल्या वर्षी मी उच्च न्यायालयात गेलो. मार्च २०२१ला मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी बीसीसीआयच्या लोकायुक्तांकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. मग गेल्या महिन्यात लोकायुक्तांनी ही शिक्षा सात वर्षांवर आणली. अंकित म्हणाला की, मला संध्याकाळी बीसीसीआयचा मेल मिळाला आहे. पण आता एमसीएला मला पत्र लिहावे लागेल आणि आगामी हंगामासाठी मुंबईकडून खेळण्यास मी सज्ज आहे, असेही मी त्यांना कळविन.