बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार पेटून उठताच शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. दरम्यान, बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केले जात असून मंदिरांचीही तोडफोड केली जात आहे. यामुळे दहशतीत असलेले हजारो हिंदू कुटुंबे भारतात येण्यासाठी बांगलादेश- भारत सीमेवर येऊन ठेपले आहेत. यामुळे बीएसएफ अलर्ट मोडवर आली आहे.
भारत-बांगलादेश सीमेवर हजारो बांगलादेशी हिंदू आपला जीव वाचवण्यासाठी भारतीय सीमेवर पोहोचत आहेत. पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील सीतालकुची येथील कुंपण असलेल्या सीमा भागात तणाव निर्माण झाला जेव्हा सुमारे एक हजार भयभीत झालेले बांगलादेशी नागरिक कुंपणाच्या पलीकडे जमले होते. भारतात आश्रय मिळेल या आशेने ते आले होते. विशेष म्हणजे हे लोक अनेक तास पाण्यात उभे होते. मात्र, सीमेवर कडक नजर ठेवणाऱ्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) हा प्रयत्न हाणून पाडला.
भारतीय सीमेवर जमलेल्या गर्दीत बहुतांश बांगलादेशी हिंदूंचा समावेश होता. बांगलादेशातील लालमोनिरहाट जिल्ह्यातील गेंडुगुरी आणि डोईखवा गावात तलावाच्या काठावरील कुंपणापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर ते जमले होते. पठांटुली गावात बीएसएफच्या १५७ बटालियनचा मोठा बंदोबस्त आणि वाहने आणि पादचाऱ्यांवर नजर ठेवल्यामुळे परकीयांचा घुसखोरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. बांगलादेशी लोक भारतात प्रवेश करण्याच्या मागणीसाठी घोषणा देत होते.
बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पुष्टी केली की, सीमेवर मोठ्या संख्येने बांगलादेशी जमा झाले होते, त्यांना नंतर परत पाठवण्यात आले. “बांगलादेशी सीमेवर जमले होते, परंतु सीमा पूर्णपणे सील केल्यामुळे कोणीही देशात प्रवेश करू शकला नाही. नंतर त्यांना देशात परत पाठवले,” असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा..
बांगलादेशी हिंदू ढाक्याच्या रस्त्यावर !
“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल भारतासाठी कृतज्ञ”
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड
इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हवाई हल्ला; १०० हून अधिक लोक ठार
बांगलादेशात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंवर अत्याचार होत असून हिंसाचार दरम्यान बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले अचानक वाढले आहेत. बांगलादेशात अनेक मंदिरांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. अनेक हिंदूंना त्यांच्या घरात घुसून मारण्यात आले. अशा परिस्थितीत बांगलादेशात राहणारे हिंदू सध्या भीतीच्या वातावरणात आहेत. या परिस्थितीला घाबरून अनेक हिंदू आता भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत.