भारताचा शेजारी असलेला देश बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार उसळला असून सत्तांतरही झाले आहे. नवे अंतरिम सरकार स्थापन झाले असले तरी देशातील परिस्थिती अशांत आहे. अशातच आता बांगलादेशला सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. बांगलादेश ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (महागाई) ११.६६ टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ १२ वर्षांतील सर्वकालीन उच्चांक आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, विशेषतः अन्नधान्याच्या महागाईने जुलैमध्ये १३ वर्षांमध्ये पहिल्यांदाचं १४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे.
देशात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे आणि निदर्शनांमुळे संपूर्ण बांगलादेशातील पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय शेख हसीन यांच्या नेतृत्वातील सरकार बरखास्त झाल्यानंतर अशांतता निर्माण झाल्यामुळे आणि नव्या सरकारमुळे केंद्रीय बँकेने जास्तीत जास्त रोख रक्कम काढण्यावर निर्बंध आणल्यामुळे देशातील व्यावसायिक क्षेत्राला तरलतेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील सरकार देशात सामान्य परिस्थिती आणण्यासाठी काम करत आहे.
सध्या बांगलादेशचे नागरिक बँकेतून एकाचंवेळी २ लाख बांगलादेशी टाका (चलन) काढू शकत नाहीत. स्थानिक किरकोळ विक्रेते म्हणतात की, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत बांगलादेशी टाकाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत असताना, किरकोळ विक्रेत्यांवर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा दबाव आहे. ज्यामुळे त्यांना चांगला नफा होऊ दिला जात नाही. देशातील अशांततेमुळे बांगलादेशातील कावरण बाजारात कमी लोक येत असून ढाक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शांतता असली तरी बांगलादेशच्या अंतर्गत भागात निदर्शने सुरूच आहेत.
दरम्यान, बांगलादेश भारतासह शेजारील देशांमधून डाळी, सुका मेवा, मसाले आणि इतर आवश्यक वस्तू आयात करतो. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तू आणि इतर वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सेंट्रल बँकेच्या माहितीवरून असे दिसून आले आहे की, बांगलादेशचा परकीय चलन साठा ३१ जुलै रोजी २०.४८ डॉलर्स बिलियनवर पोहोचला आहे. जो मागील महिन्याच्या २१.७८ डॉलर्स बिलियन वरून कमी झाला आहे. त्यामुळेच अंतरिम सरकारला एका दिवसात जास्तीत जास्त रोख पैसे काढण्याची मर्यादा घालावी लागली आहे.
हे ही वाचा:
भाजपाने त्रिपुुरातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदांत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला!
वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !
नाझिया खान यांनी शिवम दुबेच्या पत्नीला केला सवाल, तुमचा विवाह मुल्ला-मौलवींना मान्य आहे काय?
बांगलादेशमध्ये अराजकता पसरली असून सुरुवातीला आंदोलन हे सरकारी नोकऱ्यांमधील कोटा प्रणालीच्या विरोधात निषेध म्हणून सुरू होते परंतु, कालांतराने हे आंदोलन सरकारविरोधी निदर्शनांमध्ये बदलले. यात आतापर्यंत किमान ४०० लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि मुहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारला.