बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली

सदस्य आणि भाविक भारतात होणाऱ्या धार्मिक समारंभात सहभागी होण्यासाठी येणार होते

बांगलादेशने इस्कॉनच्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्याची परवानगी नाकारली

भारताचा शेजारी देश असलेल्या बंगलादेशमध्ये सत्तापालटानंतर अस्थिरता निर्माण झाली असून अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात असून हिंदूंना अटक करणे, मंदिरांची तोडफोड करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. अशातच आता नवी माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, वैध प्रवासी कागदपत्रे असूनही, बांगलादेश सीमा अधिकाऱ्यांनी इस्कॉन या हिंदू आध्यात्मिक संघटनेच्या साधारण डझनभर सदस्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारली.

बांगलादेशमधील विविध जिल्ह्यातील भाविकांसह ५४ सदस्य शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी बेनापोल बॉर्डर क्रॉसिंगवर दाखल झाले. मात्र, तासनतास वाट पाहिल्यानंतर त्यांना कळवण्यात आले की त्यांचा प्रवास अधिकृत नाही. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. बांगलादेशमध्ये सातत्याने या संघटनेला लक्ष्य केले जात असून या संघटनेच्या प्रमुख व्यक्तींना अटक केल्याच्या घटना घडत असतानाचा आता हा प्रकार समोर आला आहे. इमिग्रेशन पोलीस अधिकाऱ्यांनी बांगलादेशी वृत्तपत्र ‘डेली स्टार’ला सांगितले की, त्यांना उच्च अधिकाऱ्यांकडून या गटाला भारतात जाण्याची परवानगी न देण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

बेनापोल इमिग्रेशन पोलीस अधिकारी इम्तियाज अहसानुल कादर भुईया यांनी सांगितले की, “आम्ही पोलिसांच्या विशेष शाखेशी सल्लामसलत केली आणि त्यानंतर इस्कॉनच्या या सदस्यांना बांगलादेशची सीमा ओलांडण्यासाठी परवानगी न देण्याच्या उच्च अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्या.” सीमा पोलीस अधिकाऱ्यांनी दावा केला की, भारतातील धार्मिक समारंभाला उपस्थित राहण्याची योजना आखत असलेल्या इस्कॉन सदस्यांकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा होता परंतु, त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या एका विशिष्ट सरकारी परवानगीचा अभाव होता आणि त्यामुळेच ते मंजुरीशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत.

इस्कॉन सदस्यांपैकी एक सौरभ तपंदर चेली म्हणाले की, “आम्ही भारतात होणाऱ्या धार्मिक समारंभात सहभागी होण्यासाठी आलो होतो पण सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आम्हाला रोखले.”

हे ही वाचा..

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा

सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!

कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी

आता बदायूँमधील जामा मशिद म्हणजे नीळकंठ महादेव मंदिर!

दरम्यान, बांगलादेशमध्ये इस्कॉनला अनेक कारवायांचा सामना करावा लागला आहे. प्रमुख साधूंना अटक केली जात असून बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, बांगलादेशी उच्च न्यायालयाने या संघटनेवर बंदी घालण्यास नकार दिला. दुसरीकडे बांगलादेश अधिकाऱ्यांनी चिन्मय कृष्णा दास यांच्यासह १७ इस्कॉन संलग्न कंपन्यांची बँक खाती ३० दिवसांच्या कालावधीसाठी गोठवण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version