26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरअर्थजगतपाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगलादेश

पाकिस्तान, श्रीलंकेच्या वाटेवर बांगलादेश

Google News Follow

Related

आर्थिक संकट म्हटलं आणि त्यातही भारताचा शेजारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पाकिस्तान किंवा मग श्रीलंका. पण आता तिसराच देश आर्थिक संकटांचा सामना करत आहे आणि तो देश म्हणजे बांगलादेश. श्रीलंकेत आर्थिक संकटांना कंटाळून लोकांनी आंदोलन केलं, नागरिकांनी तत्कालीन राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला. देश दिवाळखोर झाला. नंतर, पाकिस्तानमध्ये महागाई, बेरोजगारीला कंटाळून लोकांनी आवाज उठवला, पुढे पाकिस्तानात सत्तांतर झालं. हे दोन्ही देश अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी हातपाय मारत असताना आता बांगलादेशमध्ये आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

बांगलादेशमध्ये अचानक वाढलेल्या महागाईमुळे आणि पेट्रोल दरवाढीमुळे बांगलादेशात नागरिकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बांगलादेशमध्ये एका रात्रीत पेट्रोलचे भाव तब्बल ५१ टक्क्यांनी वाढलेत तर डीझेलचे दर हे ४५ टक्क्यांनी वाढलेत. रशिया- युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीनंतर बांगलादेशमध्ये महागाई वाढल्याचं आणि एकूणच आर्थिक संकट उभं राहिल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं आहे.

बांगलादेशमधील आर्थिक संकटामागची कारणं कोणती आहेत?

बांगलादेशाने दुसऱ्या देशातून सामान मागवण्यात अधिक पैसा खर्च केला आहे. म्हणजेच इम्पोर्ट जास्त केलं आणि आपल्या देशातून एक्स्पोर्ट कमी केला आहे. इम्पोर्ट- एक्स्पोर्ट बाबतचं नियोजन नसल्यामुळे बांगलादेशावर ही परिस्थिती ओढावल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला कोरोना काळ आणि नंतर रशिया- युक्रेनच्या युद्धामुळे तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेत. त्यामुळे बांगलादेशात पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. युद्धामुळे मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण बिघडलं. तसेच कोरोनामुळे ओपेक देशांनी म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टींग कंट्रीजने तेलाचा पुरवठा बंद केला. त्यामुळे त्याचा परिणामही देशभरात जाणवला.

बांगलादेशचं २०२१- २२ च एक्स्पोर्ट लक्ष्य हे १० महिन्यात पूर्ण झालं होतं. साधारण ४३ अब्ज डॉलर्सची उत्पादनं एक्स्पोर्ट केली. शिवाय यंदा बांगलादेशकडून कपड्यांचं, लेदरचं एक्स्पोर्ट जास्त झालंय आणि त्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त वाढसुद्धा झाली आहे. मात्र, एक्स्पोर्ट वाढलं असलं तरीही उत्पन्नात घट झाली आहे.

बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेच्या आकडेवारीनुसार, बाहेरील देशात काम करत असलेल्या बांगलादेशी नागरिकांनी २०२०- २१ मध्ये २६ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त परकीय चलन साठा पाठवला होता, जो २०२१- २२ मध्ये १७ बिलियन डॉलर्सच्या जवळ आला आहे.

बांगलादेशातला चलन वाढीचा दर गेल्या ९ महिन्यात ६ टक्क्यांहून जास्त आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातसुद्धा मोठी घट नोंदवली आहे. आकडेवारीनुसार, ३ ऑगस्ट २०२२ पर्यंत, बांगलादेशकडे सुमारे ४० अब्ज डॉलर्सचा विदेशी साठा होता, ज्यामुळे केवळ पाच महिने देशाला इम्पोर्ट करता येणार आहे. दरम्यान, डॉलरच्या संकटाचा सामना करण्यासाठी बांगलादेश सरकारने लक्झरी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे तर, सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश प्रवासावरसुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तसेच जे प्रकल्प आता तातडीने पूर्ण करण्याची गरज नाही आहेत अशा प्रकल्पांवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

बांगलादेशला महागाईचा फटका दुसऱ्या बाजूने बसलाय तो तेथील वस्त्र उद्योगावर. लोकांना आता जीवनावश्यक वस्तूंची गरज पडू लागली आहे त्यामुळे बांगलादेशामधला वस्त्रोद्योग जरी अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणारा असला तरी प्राधान्य वेगळ्या वस्तूंना असल्यामुळे त्याचा एक्स्पोर्टवर मोठा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा:

खेळाडूंची पुढची पिढी तयार होतेय, ‘तो’ व्हिडीओ बघून आनंद महिंद्रांची प्रतिक्रिया

संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा

शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ

गेल्या महिन्यात, बांगलादेशने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ४.५ अब्ज डॉलर्सची IMF कडे कर्जाची मागणी केली होती. मात्र, देशाची आर्थिक घडी पाहता IMF ने बांगलादेशला एक बिलियन डॉलरहून अधिक कर्ज देता येणार नाही, असं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशन्सकडून World Happiness अहवाल पब्लिश करण्यात आला होता. यामध्ये नेपाळ ८४ व्या क्रमांकावर होता. बांगलादेश ९४ व्या क्रमांकावर होता. तर पाकिस्तान १२१ व्या क्रमांकावर होता. त्यानंतर श्रीलंका १२७ व्या क्रमांकावर होता. तर या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारत मागे राहिला म्हणून अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. पण आता जी परिस्थिती बांगलादेशात आहे किंवा इतर शेजारी देशात आहे त्यावरून लक्षात येतं की जास्त Happiness कुठेय.

एकीकडे बांगलादेशाचा पाय खोलात रुतत असताना चीन सारखा कपटी देश मात्र दुसरीकडे बांगलादेशच्या या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी तयारी करत आहे. चीन बांगलादेशला आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. चीन बांगलादेशी वस्तू आणि सेवा शुल्क मुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. चीन बांगलादेशाला वस्त्रोद्योगासाठी कारखाने आणि तांत्रिक सहाय्यसुद्धा देण्याच्या तयारीत आहे. तिकडच्या काही मेट्रो प्रकल्पात चीनची गुंतवणूक आहे. पण, चीनची ओळख म्हणजे विकसनशील देशांना पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी भरघोस कर्ज देऊन कर्जाच्या दरीत ढकलायचे. नंतर जाचक अटी लादून त्यांच्या मालमत्ता, जमिनी हडप करायचा अशी आहे. पण, आज अनेक अशी उदाहरणं आहेत जी चीनच्या या भूमिकेचे शिकार झालेत. भारताच्या आजूबाजूच्या देशांचा यात समावेश आहे. चीनच्या नादी लागल्याने श्रीलंका दिवाळखोर झालाय. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलीये. नेपाळची अर्थव्यवस्थाही फार काही बरी नाहीये आणि आता बांगलादेशची स्थितीही काहीशी सारखी आहे. त्यामुळे आता आपल्या आजूबाजूची उदाहरण पाहून बांगलादेश त्यातून धडा घेणार की चीनची मदत घेऊन कालांतराने आणखी संकटांचा सामना करणार हे येत्या काळात कळेलच.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा