क्रीडा विश्वातील बहुचर्चित अशी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार असून यंदा फ्रान्समध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमित्त जगभरातून खेळाडू फ्रान्समध्ये दाखल होत आहेत. अशातच, फ्रान्सने रशिया आणि बेलारूस या दोन देशांना मात्र ऑलिंपिकचे निमंत्रण पाठवले नसून रशियाला सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे.
दर चार वर्षांनी खेळवली जाणारी ऑलिंपिक स्पर्धा ही जागतिक दर्जाची स्पर्धा आहे. जगभरातील देशातील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. मात्र, बेलारूस आणि रशिया या दोन देशांना स्पर्धेचे निमंत्रण पाठवण्याचे टाळण्यात आले आहे. त्यामुळे रशियाला सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. रशिया- युक्रेन युद्धामुळे रशियाला आणि रशियाचा जवळचा मित्रदेश बेलारूस यांना ऑलिंपिकचं निमंत्रणच दिलं गेलं नाही. यापूर्वी त्यांचे खेळाडू उत्तेजक चाचणींत दोषी सापडल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते.
रशिया आणि बेलारूस या दोन्ही देशांना बोलावणं आले नसले तरी फ्रान्सकडून रशियाच्या ३६ आणि बेलारूसच्या १८ खेळाडूंना वैयक्तिक सहभागासाठी निमंत्रण देण्यात आले होते. त्यापैकी रशियाचे १५ खेळाडू आणि बेलारूसचे १७ खेळाडू पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आहेत. मात्र, हा सहभाग हा खेळाडूंचा वैयक्तिक सहभाग मानला जात असून त्यांना राष्ट्रध्वज बाळगण्यासाठी परवानगी नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्या देशांवर बंदी असते पण त्यांचे खेळाडू वैयक्तिक सहभाग घेतात अशा खेळाडूंना Individual Nuetral Athelets म्हणतात. त्यामुळे रशिया आणि बेलारूसचे खेळाडूही याच गटातून सहभागी होणार आहेत. फ्रान्सने वैयक्तिक खेळाडूंना निमंत्रण देतानाही जे खेळाडू रशिया युक्रेनच्या युद्धात उघडपणे रशियाला पाठिंबा देतात आणि युक्रेनला विरोध करतात अशा खेळाडूंना निमंत्रण दिलेलं नाही. तसेच जे खेळाडू रशियन सैन्यात आहेत, त्यांनाही या स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजातून १४ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका
कारगिल विजय दिवस: २५ वर्षांपूर्वी पाकिस्तानला चारी मुंड्या चित करून भारताने ‘कारगिल’ जिंकले!
पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात
या खेळाडूंना रशियाचा राष्ट्रध्वज किंवा रशियाचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही गोष्ट स्वतःजवळ बाळगण्याची परवानगी नाही. तसेच, ऑलिंपिकच्या उद्घाटन समारंभात होणाऱ्या परेड ऑफ नेशन्समध्ये त्यांना सहभाग घेता येणार नाही. शिवाय त्यांनी पदके जिंकली तर ती त्यांच्या देशाच्या नावावर जमा न होता, त्यांच्या वैयक्तिक नावांवर जमा होतील. त्यांच्या देशाचा ध्वजही कोठेच फडकवला जाणार नाही.
रशिया-युक्रेनच्या युद्धात फ्रान्स युक्रेनला पाठिंबा देतंय. रशियाविरुद्ध लढण्यासाठी फ्रान्सने युक्रेनला शस्रसाठाही पुरवलाय. त्यामुळे साहजिकच रशिया आणि फ्रान्समध्ये तणावाचे संबंध आहेत. फ्रान्सच्या या निर्णयानंतर रशियन सरकार मात्र वेगळीच भूमिका मांडत आहे. “आमच्या खेळाडूंना तुमच्याकडे खेळायचे नाहीये म्हणून त्यांनी स्वतःच फ्रान्सचे निमंत्रण नाकारलं,” असं रशियाचे म्हणणे आहे.