राष्ट्रकुल स्पर्धेत सलग दुसरे सुवर्ण
भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक जिंकल्यानंतर सातत्याने दुखापतींचा सामना केला. याच दुखापतींमुळे इस्तंबूल येथील स्पर्धेतूनही त्याने माघार घेतली. पण मिशिगन येथे केलेल्या सरावाची गोड फळे त्याला चाखायला मिळाली. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकून मेहनतीच चीज केले.
६५ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये त्याने ही कामगिरी केली. बजरंगच्या या पदकामुळे भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांची संख्या २२वर पोहोचली. कॅनडाच्या लॅकलन मॅकनिलला त्याने ९-२ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत १०२ पदके कुस्तीत जिंकलेली आहेत. नेमबाजी खालोखाल भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळाली आहेत ती कुस्ती या क्रीडाप्रकारात. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेती तिसरे पदक ठरले. २०१४च्या आपल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पहिले पदक जिंकले. ते रौप्यपदक होते. नंतर गोल्ड कोस्ट स्पर्धेत त्याने चार वर्षांनी सुवर्णपदकावर मोहोर उमटविली.
हे ही वाचा:
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर
सायबर गुन्हेगारांचं ‘लक्ष्य’ विद्यार्थ्यांवर
धर्मांतर करण्यासाठी पालघरमध्ये आलेले ख्रिश्चन मिशनरी पोलिसांच्या ताब्यात
विशेष म्हणजे बजरंगने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचताना एकही गुण प्रतिस्पर्ध्याविरुद्ध गमावला नाही. उपांत्य फेरीत तर त्याने प्रतिस्पर्धी जॉर्ज रॅम या इंग्लंडच्या खेळाडूवर १०-० अशी मात केली. अवघ्या ९१ सेकंदांत त्याने बाजी मारली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने मॉरिशसच्या जोरिस बॅन्डू याच्यावर ६-० असा विजय मिळविला.
याआधी, महिलांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या अंशू मलिकने रौप्यपदक जिंकले. नायजेरियाच्या ओदुनायो अदेकुओरोकडून तिला ३-७ असा पराभव पत्करावा लागला.