दिल्लीत काही दिवसांपूर्वी साहिलने साक्षी या मुलीवर सुऱ्याने प्रहार केले आणि नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्या घटनेत अनेक लोक तिथे उपस्थित असतानाही कुणीही त्या साक्षीच्या मदतीला धावले नाही. त्यावरून लोकांचा या वर्तणूकीबद्दल चिंता व्यक्त केली गेली. पण फ्रान्समध्ये नुकतीच एका विकृताने मुलांवर सुऱ्याने हल्ला केल्याची घटना घडली, त्या घटनेवेळी एका तरुणाने धाव घेत आपल्या पाठीवरील बॅगच्या सहाय्याने त्या विकृताला पळवून लावले, त्याचे फ्रान्समध्ये कौतुक होत आहे.
फ्रान्समध्ये काही दिवसांपूर्वी सिरियातून तिथे निर्वासित म्हणून आलेल्या एका विकृताने लहान मुलांवर सुऱ्याने हल्ला केला होता. त्या प्रकरणात या विकृताला रोखणाऱ्या एका तरुणाचे आता कौतुक होत असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही त्याला शाबासकीची थाप दिली आहे.
या तरुणाचे नाव हेन्री डीऍनसेलेम असे असून तो २४ वर्षांचा आहे. त्याने या भयंकर घटनेवेळी दाखविलेले प्रसंगावधान आता कौतुकाचा विषय होतो आहे. यासंदर्भातील व्हीडिओ आता व्हायरल होत असून त्यात हेन्रीने या मनोविकृताचा पाठलाग केला होता. त्याने आपल्या पाठीवरील बॅगच्या सहाय्याने या विकृताकडील सुरा दूर भिरकावून दिला होता. हा विकृत माणूस मुलांवर हल्ला करत असताना पालक किंचाळत होते, तेव्हा या हेन्री नावाच्या तरुणाने हे ऐकले आणि तो त्या विकृताच्या मागे धावला.
हे ही वाचा:
धुळ्यात हिंदूंचा जनसागर लोटला!
पालखी मार्ग, वारकऱ्यांची विश्रांती स्थाने, पाण्याची व्यवस्था उत्तम राखा!
सादरीकरणावेळी मंचावरचं भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन
भाई जगतापांची गच्छंती, वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष
आपल्या या कृतीबद्दल हेन्री म्हणाला की, तो विकृत माणूस मुलांवर हल्ला करत असताना मला क्षणभर वाटले की, त्याने आणखी मुलांना जखमी करू नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. मी पुढे काय होईल याचा विचारही केला नाही.
गेले नऊ महिने हा हेन्री फ्रान्समधील विविध चर्चना भेटी देत आहे. तो ख्रिस्ती धर्मप्रसारक आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ऍन्सी पार्कमध्ये तो छायाचित्रे घेत होता. तेव्हाच ही घटना घडली. मुले आपल्या पालकांसमवेत खेळत होती. तिथे छायाचित्रे घेत असताना या हल्लेखोराने मुलांवर हल्ला केला. तो सुऱ्याने भोसकू लागला. त्या माणसाच्या हातात मोठा सुरा असल्याचे हेन्रीच्या लक्षात आले. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने त्या विकृताचा पाठलाग केला. आपल्या पाठीवरील बॅगच्या सहाय्याने त्याने त्या व्यक्तीच्या हातातून सुरा पडेल यासाठी प्रयत्न केले. याबद्दल तो म्हणाला की, माझ्या पाठीवर २० किलोची बॅग होती. त्याचा पाठलाग करता करता तो माणूस पुढे निघून गेला.
त्याचे आता सर्वत्र कौतुक होत असून बॅकपॅक हिरो अशी उपमा त्याला देण्यात आली आहे. पण आपल्या या कृतीबद्दल त्याला फारसे कौतुक वाटत नाही उलट हे कुणीही केले असते असे तो म्हणतो. मी कर्मधर्मसंयोगाने तिथे होतो. खरे तर प्रत्येक माणूस हे करू शकतो, जे मी केले.