विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानची अतिशय वाईट कामगिरी झाली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. तसेच, त्याला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे आभारही मानले.
उपांत्य फेरीत प्रवेश करू न शकलेला पाकिस्तानचा संघ बुधवारी पाकिस्तानला परतला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम याने लाहोरमध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख झाका अश्रफ यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर बाबर आझमने हा निर्णय जाहीर केला. तो कर्णधारपदावरून पायउतार झाला असला तरी तो पाकिस्तानसाठी खेळणे थांबवणार नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसाठी खेळताना बाबरची कामगिरी चांगली झाली नाही. तो संपूर्ण स्पर्धेत अवघ्या ३२० धावा करू शकल्या.
‘आज मी पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा कठीण निर्णय आहे, परंतु मला वाटते की, हीच योग्य वेळ आहे. परंतु मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणे कायम ठेवणार आहे. मी माझ्या अनुभवासह आणि निष्ठेसह येथे नव्या कर्णधाराला आणि संघाला पाठिंबा देण्यासाठी, सदैव तत्पर आहे,’ असे आझम याने ‘एक्स’वर नमूद केले आहे.
हे ही वाचा:
गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू
शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग
जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज
पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी
बाबर याने सन २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० स्पर्धेत पहिल्यांदा पाकिस्तानेच कर्णधारपद भूषवले होते. नंतर तो कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटचाही कर्णधार झाला. मात्र गेल्या चार वर्षांत त्याला कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. सन २०२२ मध्ये यूएईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ उपविजेता ठरला होता. मात्र गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये झालेल्या एकाही कसोटी सामन्यात तो संघाला विजय मिळवू देऊ शकला नाही.