आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला आहे. या सामन्यात गत विजेत्या इंग्लंडला हरवत ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियन संघाची सलामीची फलंदाज एलीसा हेली या विजयाची शिल्पकार ठरली.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाच्याच पथ्यावर पडला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड समोर ३५६ धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने चांगलाच पाया रचला. एलीसा हेली १३८ चेंडूंमध्ये १७० धावांची धमाकेदार खेळी केली. तर रचेल हायनेस हिने ६८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी १६० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर बेथ मुनी हिने देखील ६२ धावा केल्या. एलीसा हेली सोबत तिने १५६ धावांची भागीदारी रचली. या तिघींच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघाने धावफलकावर ३५६ धावांचे भले मोठे विजयी आव्हान इंग्लंड समोर ठेवले.
हे ही वाचा:
काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ
शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर
शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण
काँग्रेसच्या ठाम भुमिकेपुढे शरद पवार नरमले? म्हणतात युपीए अध्यक्ष होण्यात रस नाही
या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंड संघाची सुरुवात अडखळत झाली. पण नॅट स्किवर हिने इंग्लंड संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिने नाबाद १४८ धावांची खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने इंग्लंडच्या फलंदाज बाद होतच होत्या. त्यामुळे २८५ धावांवरच इंग्लंडचा संघ बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा महिला क्रिकेट विश्वचषकावर आपली हुकूमत सांगितली. या सामन्यातील आणि एकूणच मालिकेतील सातत्याच्या चांगल्या खेळीमुळे एलीसा हेलीला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.