ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला

संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक विस्कळीत

ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी फ्रान्समध्ये रेल्वे लाईन्सवर हल्ला

फ्रान्समध्ये लवकरच ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या समारंभाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच पॅरिसमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला. फ्रान्समधील हायस्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सुमारे ८ लाख लोकांना याचा फटका बसला आहे.

पॅरिसमधील रेल्वे नेटवर्कवर शुक्रवार, २६ जुलै रोजी हल्ला झाला. पॅरिसच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.१५ वाजता अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळच्या घटना घडल्या. या हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या ९० मिनिटे उशिराने धावत आहेत. या हल्ल्यामुळे जवळपास आठ लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत.

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरू होत असताना आणि आठवड्याच्या शेवटी गर्दी वाढणार होती अशा वेळी हे हल्ले करण्यात आले आहेत. आता यामुळे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनी SNCF ने सर्व प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांना स्टेशनवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हर्जराइट यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे.

हे ही वाचा:

पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

कमला हॅरिस म्हणाल्या, ‘इस्रायल-गाझा’ युद्धावर गप्प बसणार नाही !

फ्रान्सच्या नॅशनल रेल्वे कंपनीने सांगितले की, देशात एकूण चार प्रमुख हाय-स्पीड ट्रेन लाईन असून या संपूर्ण देशाला पॅरिसशी जोडतात. त्यापैकी तीन लाईन्सवर हल्ले झाले तर एका रेल्वे मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात आला. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारपासून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला सुमारे तीन लाख प्रेक्षक आणि १० हजार ५०० खेळाडू उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी ४५ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत.

Exit mobile version