दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि अनेक दहशतवादी संघटनांना आपल्या पंखाखाली सुरक्षित ठेवणाऱ्या पाकिस्तानचे डोळे आता उघडले आहेत. पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले असल्याची कबुली पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वरुल हक काकर यांनी स्वतः दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेणाऱ्या तालिबानचे एकेकाळी समर्थन करणाऱ्या आणि अनेक दहशतवादी संघटनांचे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा चांगलाच दणका बसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
काबूलमध्ये म्हणजेच अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढले असल्याची कबुली पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वरुल हक काकर यांनी नुकतीच दिली आहे. कट्टर इस्लामवादी असलेल्या तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. यामुळे पाकिस्तानला विरोध करणाऱ्या दहशतवादी गटांवर, विशेषत: तेहरिके तालिबान पाकिस्तानसारख्या संघटनांवर कारवाई होण्याची आणि पाकिस्तानविरोधातील कारवाईसाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर न होण्याची आशा पाकिस्तान सरकारला वाटली होती. मात्र, पाकिस्तानमध्ये शांतता निर्माण होण्याऐवजी मागील दोन वर्षांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
हे ही वाचा:
वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर
‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’
बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!
घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!
हल्ल्यांचे प्रमाण ६० टक्क्यांनी आणि आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाणही चांगलेच वाढल्याची खंत हंगामी पंतप्रधान काकर यांनी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान सोडताना एकही शस्त्र मागे सोडले नसल्याचा दावा अमेरिकेने केला होता. मात्र, अफगाणिस्तानमधील दहशतवादी पाकिस्तानविरोधात अमेरिकी बनावटीच्याच शस्त्रांचाच वापर करत असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान काकर यांनी केला आहे. अमेरिकी बनावटीची शस्त्रे काळ्या बाजारात सर्रास मिळत असून पाकिस्तानसह अफगाणिस्तान आणि अरब देशांमध्येही ती उपलब्ध होत असल्याची तक्रार पाकिस्तान सरकारने केली आहे.