पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या विश्लेषणातून आकडेवारी समोर
जगात सध्या कोविडने थैमान घातले आहे. मात्र आता कोविडवर लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. लसीकरणामध्ये ॲस्ट्राझेनेकाची लस प्रभावी ठरत असल्याचे देखील म्हटले जात आहे. ब्रिटनमध्ये होत असलेल्या लसीकरणानंतर पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधितांच्या मृत्युदरात ८० टक्क्यांची घट झाली आहे.
ॲस्ट्राझेनेकाच्या लशीच्या पहिल्या डोसमुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो. तर, अमेरिकन कंपनी फायजरच्या लशीच्या दोन डोसमुळे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका ९७ टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी या निष्कर्षाचे स्वागत केले असून करोना महासाथीपासून बचाव करण्यासाठी लस प्रभावी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार, आतापर्यंत झालेल्या करोना लसीकरणामुळे किमान १० हजार जणांचे प्राण वाचले आहेत. ब्रिटनच्या एक कोटी ८० लाख लोकसंख्येपैकी सरासरी दर तीन पैकी एका प्रौढ व्यक्तीला करोनाची लस देण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये करोना संसर्ग, रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण आणि मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
हे ही वाचा:
सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट
इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष पुन्हा भडकला
तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा
ही आकडेवारी जाहीर करण्याआधी ५० हजार लोकांची माहिती तपासली असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे. या बाधितांना डिसेंबर ते एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. यातील १३ टक्के जणांना फायजरच्या लशीचा एक डोस आणि आणि ८ टक्केजणांना एस्ट्राजेनका लशीचा एक डोस देण्यात आला होता. या लशीच्या डोसमुळे मृ्त्यूंची शक्यता किमान ८० टक्क्यापर्यंत कमी केली होती.
ही माहिती भारतासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामध्ये ॲस्ट्राझेनेकाच्या लसीचे कोविशिल्ड या नावाने उत्पादन होत आहे. त्याबरोबरच भारतातील लसीकरण मोहिमेची मोठी मदार कोविशिल्ड या लसीवर आहे. त्यामुळे कोविशिल्डचे प्रभावशाली असणे अनेक भारतीयांसाठी दिलासादायक ठरणार आहे.