आकाशात हिंदुस्थानची सत्ता प्रस्थापित करणारे अस्त्र

आकाशात हिंदुस्थानची सत्ता प्रस्थापित करणारे अस्त्र

भारतीय हवाई सेनेने आकाशात आपली सद्दी पुनर्स्थापित करणारे अस्त्र सज्ज असल्याची घोषणा केली आहे. ‘अस्त्र’ हे हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता असलेले आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडील लक्ष्याचा भेद करू शकणारे, संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.

अस्त्राचा पल्ला ११० किमीचा आहे. सध्या हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई सेनेचा पाठीचा कणा असलेल्या सुखोई-३०एमकेआय या विमानाच्या सहाय्याने डागता येणार आहे. भविष्यात हे अस्त्र तेजस, मिग-२९ (संपूर्ण ताफा) आणि मिराज २००० यांच्यासाठी देखील तयार केले जाईल. भारताचा ७१ वा गणतंत्र दिवस अवघ्या नऊ दिवसांवर आलेला असताला समस्त भारतीयांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी हवाई सेनेकडून देण्यात आली आहे.

साधारणपणे ११० किमीचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची निर्मीती भारताने गेल्यावर्षी बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईक नंतर करण्यात आली आहे. या स्ट्राईकच्या वेळेस पाकिस्तानी हवाई सेनेने एआयएम-१२० एएमआरएएएम हे ११० किमी पल्ल्याचे, नजरेच्या टप्प्याच्या बाहेर मारगिरी करू शकणारे क्षेपणास्त्र डागले होते. त्यामुळे या हल्ल्याच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या सुखोई-३० एमकेआय या विमानांना माघार घ्यावी लागली होती. त्यावेळेस भारताकडे आर-७७ ही ८० किमी पल्ला असलेली क्षेपणास्त्रे होती.

भारतीय हवाईसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यावर कायम राहून त्याचा माग घेणाऱ्या आधुनिक प्रणालीने युक्त आहे. हे क्षेपणास्त्र लहान पल्ल्यावरील (२० किमीच्या) अंतरावरील आणि ८०-११० किमी पल्ल्यावरील अंतराचा वेध घेण्याच्या क्षमतेचे आहे. या अस्त्रामुळे भारतीय हवाई सेनेचा हवेतील दबदबा पुन्हा प्रस्थापित होईल.

Exit mobile version