जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे निःशस्त्र पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध जगभरातील देश करत आहेत. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे. यानंतर आता पाकिस्तानवर टीकास्त्र डागण्यात येत असून पाकिस्तानने हल्ल्यात आपला संबंध नसल्याचे म्हणत हात वर केले असले तरी भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली आहे. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे.
पाकिस्तानला अधिकृतपणे दहशतवादाचा प्रायोजक राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी मायकेल रुबिन यांनी अमेरिकेकडे केली आहे. याशिवाय त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावरही आपली तोफ डागत त्यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली आहे. तसेच असीम मुनीर यांच्यावर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप केला आहे. एएनआयशी बोलताना रुबिन म्हणाले, “अमेरिकेने फक्त एकच प्रतिक्रिया द्यावी ती म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाचा प्रायोजक राज्य म्हणून औपचारिकपणे घोषित करणे आणि असीम मुनीरला दहशतवादी म्हणून घोषित करणे. ओसामा बिन लादेन आणि असीम मुनीर यांच्यातील फरक एवढाच आहे की, ओसामा बिन लादेन एका गुहेत राहत होता आणि असीम मुनीर एका राजवाड्यात राहतो, परंतु त्यापलीकडे दोघेही एकसारखे आहेत आणि त्यांचा शेवटही सारखाच असावा,” अशी टीका करत त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
मायकेल रुबिन पुढे म्हणाले की “भासवता येऊ शकते की, पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता नाही, पण पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता आहे आणि हेच सत्य आहे. ज्याप्रमाणे बिल क्लिंटन भारतात गेले तेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता, त्याचप्रमाणे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स भारत दौऱ्यावर असताना दहशतवादी हल्ला झाला. ही एक प्रकारची उत्स्फूर्त कृती असल्याचा समज करून अमेरिकेने पाकिस्तानला यातून अजिबात सूट देता कामा नये,” असे स्पष्ट मत मायकेल रुबिन यांनी मांडले आहे.
हे ही वाचा :
पीओकेमधील ४२ सक्रीय लाँच पॅडवर भारतीय लष्कराची नजर!
एका आठवड्यात देश सोडून चालते व्हा! भारताचा पाक राजदूतांना इशारा
भारताकडून सिंधू पाणीवाटप करार रद्द; पाकिस्तानला कसा बसणार फटका?
भारताने पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताकडे दिली ‘पर्सोना नॉन ग्राटा’ नोट
रुबिन यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्याची आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची तुलना केली. त्यांनी म्हटले की, दोन्ही हल्ल्यांमध्ये शांतताप्रिय नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलमधील उदारमतवादी यहूदी आणि भारतातील मध्यमवर्गीय हिंदूंना लक्ष्य केले गेले. हमासने जे केले तेच पाकिस्तानने करत मध्यमवर्गीय हिंदूंना लक्ष्य केले. इस्रायलने हमाससोबत जे केले ते आता भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आयएसआयसोबत करायला हवे. आयएसआयच्या नेतृत्वाला नष्ट करण्याची वेळ आली आहे आणि त्यांना एक नियुक्त दहशतवादी गट म्हणून वागवण्याची आणि भारताचा मित्र असलेल्या प्रत्येक देशाने, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा मित्र असलेल्या प्रत्येक देशानेही असेच करावे अशी मागणी करण्याची वेळ आली आहे, असे रुबिन म्हणाले.