मणिपूरमधील हिंसाचार शमण्याची चिन्हे नाहीत. उलट हा हिंसाचार अधिकाधिक उग्र रूप धारण करू लागला आहे. मणिपूरच्या बिष्णुपूर येथील भारतीय राखीव दलाच्या मुख्यालयाला लक्ष्य करून सुमारे ५०० जणांचा जमाव येथे धडकला होता. तेव्हा त्यांनी २९८ रायफलींसह, विविध प्रकारची शस्त्रे, ग्रेनेड्सची लूट केली. तसेच, १६ हजार काडतुसेही पळवून नेली. त्यामुळे सैनिकांना जमावाला रोखण्यासाठी गोळीबाराच्या ३२७ फैऱ्या झाडाव्या लागल्या आणि २० अश्रुधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या. ३ मे रोजी जातीय संघर्ष झाल्यापासून ही आतापर्यंतची सर्वांत मोठी शस्त्रलूट असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय राखीव दलाच्या मुख्यालयाभोवती असणारी कडक सुरक्षाव्यवस्था मोडून जमावाने शस्त्रागाराची लूट कशी काय केली, याबाबत मणिपूरचे पोलिस महासंचालक राजीव सिंह यांनीही शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केले. तीन महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार भडकल्यापासून जमावाकडून शस्त्रे आणि दारूगोळ्याची ही सर्वांत मोठी लूट मानली जात आहे. लुटली गेलेली काही शस्त्रे २४ तासांच्या आत जप्त करण्यात आली असली तरी पोलिसांनी त्याचा तपशील देण्यास असमर्थता दर्शवली.
‘शस्त्रांची अशी लूट याआधीही झाली होती. आम्ही हे गांभीर्याने घेत आहोत. शस्त्रे हिसकावणे हा गंभीर गुन्हा आहे,’ असे मणिपूरचे पोलिस महासंचालक राजीव सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. “सुरक्षा कर्मचारी असतानाही जमावाने असे कृत्य कसे काय केले, हे जाणून घेण्यासाठी मी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्याला मुख्यालयात पाठवले आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.
हे ही वाचा:
देशाच्या सक्षमीकरणासाठी तरुणांनी योगदान द्यावे
इम्रान खान यांना अटक, पाच वर्षे राजकारणातून बाद
डोळ्याला पट्टी बांधून असलेल्या आदित्य ठाकरेंना उत्तर देऊन फायदा काय?
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा न्यायालयातच राजीनामा
त्रिपुरा केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सिंह यांची जूनमध्ये पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ४० ते ४५ जणांचा जमाव हलक्या वाहनांनी मुख्यालयाजवळ आला तर बरेचसे जण पायीच येथे धडकले होते. सकाळी ९.४५च्या सुमारास मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर, त्यांनी सुरक्षारक्षकांना बाजूला सारत आतमध्ये प्रवेश केला. बिष्णुपूर जिल्ह्यातील केरेनफाबी आणि थंगलावाई पोलिस चौक्यांमधून शस्त्रे आणि दारुगोळा लुटणारा हाच जमाव होता, असे पोलिसांनी सांगितले.
जमावाने मणिपूर रायफल्सची सातवी तुकडी, मणिपूर रायफल्सची दुसरी तुकडी आणि हेनगांग आणि सिंगजामेई पोलिस ठाण्यामधून शस्त्रे आणि दारूगोळा हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. सुरक्षा दलांनी लुटारूंचा पाठलाग केला, मात्र ते व्यर्थ ठरले. मे महिन्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून पहिल्या काही दिवसांत, जमावाने इंफाळमधील राज्य दलाच्या शस्त्रास्त्रांमधून ४,६१७ स्वयंचलित आणि अर्ध स्वयंचलित शस्त्रे आणि सहा लाखांहून अधिक दारुगोळा लुटला. इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, कक्चिंग, थौबल, बिष्णुपूर, चुराचंदपूर, कांगपोकपी, टेंगनौपाल आणि कमजोंग येथे ही लूट झाली आहे. मात्र लुटीचा मोठा भाग अद्याप सापडलेला नाही.