गेल्या काही दिवसांपासून फ्रान्समध्ये हिंसाचार उसळला असून हा हिंसाचार शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. पॅरिसमध्ये पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर गोळीबार केला होता. त्यानंतर फ्रान्समधील नागरिकांनी पोलीस आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर पाचव्या दिवशीही हिंसाचार सुरू असून मार्सेल शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाला आहे.
शनिवारी फ्रान्समध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी ९०० आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती. तर, शुक्रवारी १ हजार ३०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. परिस्थिती अधिक चिघळण्याची स्थिती असून पॅरिसमध्ये लुई व्हिटॉनसारख्या ब्रँडची दुकाने आंदोलकांकडून लूटण्यात येत आहेत. झारा, ऍपल आणि नायकीसारख्या ब्रँडच्या दुकानांचीही लूट आंदोलकांनी केली आहे.
प्रकरण काय?
पॅरिसच्या उपनगरात मंगळवारी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी १७ वर्षीय नाहेल एम. नावाच्या मुलावर गोळीबार केला होता. या गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच सरकार आणि पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप उफाळला आणि आंदोलनाला आता हिंसक वळण मिळाले आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”
या घटनेच्या निषेधार्थ पॅरिस उपनगरात आणि फ्रान्समधील रस्त्यावर नागरिक उतरले आहेत. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांकडून गाड्यांची जाळपोळ, इमारती आणि दुकानांची लुटमार सुरु आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रू धुरांचा वापर केला आहे. तसेच अनेक आंदोलकांना अटक देखील करण्यात आली आहे.