असं म्हणतात की, एव्हरेस्ट सर करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. एकदा का ही इच्छाशक्ती तुमच्या सोबत असली की मग कुठलाही प्रसंग कठीण नाही. अशीच दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून महाराष्ट्र पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी एव्हरेस्ट सर केला.
यासंदर्भात बोलताना गुरव म्हणाले, “जेव्हा मी एव्हरेस्ट सर करण्याची कल्पना मनात आणली त्यानंतर तयारीला सुरुवात झाली. सुरुवातीला मला २ किमी धावणेही कठीण गेले होते. परंतु कालांतराने सराव करून मी माझा स्टॅमिना वाढवला. काही महिन्यांतच मी अर्ध मॅरेथॉन (२१ किमी) आणि मॅरेथॉन करू शकलो. शारिरीक फिटनेससाठी त्यांनी घरी सायकलिंग केले त्याच जोडीला योगाभ्यासही केला.
करोनाचे जगभर तांडव सुरु असताना त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली होती. हा निर्णय नक्कीच धाडसाचा होता. ९ मे रोजी त्यांनी इतर पाच गिर्यारोहक आणि शेर्पांसह या मोहिमेचा श्रीगणेशा केला. ठरल्याप्रमाणे त्यांची मोहीम पुढे जात होती. या मोहिमेत ठरल्याप्रमाणे त्यांचे चारही बेस कॅम्प उत्तम पार पडले. हे सर्व घडत असताना मात्र २० मे रोजी खराब हवामानामुळ त्यांना दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागला. दोन दिवसानंतर हवामानात मोठी सुधारणा झाली नाही तरीही त्यांनी ठरल्याप्रमाणे पुढे चढाई करण्यास सुरुवात केली. अखेर ज्या क्षणाची ते वाट पाहात होते तो क्षण आला. एव्हरेस्ट सर केल्यानंतर सर्वात आधी त्यांनी आईचा फोटो बाहेर काढला आणि तिला नमन केले. शिखरावर त्यांनी आईच्या फोटोसह, भारतीय ध्वज आणि महाराष्ट्र पोलिसांचे पोस्टरही तिथे लावले. तब्बल २० मिनिटे शिखरावर घालवल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन तिथून निघाले. येत्या काही आठवड्यांत त्यांना या कामगिरीसाठी गौरवान्वित केले जाईल आणि प्रमाणपत्रही मिळेल.
गुरव यांनी पोलिस दलातील आपल्या सहकार्यांचेही आभार मानले. मोहिमेसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणारे वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले. अतिरिक्त महासंचालक आणि नवी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी टीओआयला सांगितले की, “केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर नवी मुंबईकर आणि महाराष्ट्र पोलिसांसाठीही ही एक मोठी कामगिरी आहे.
पडवळवाडी या गुरव यांच्या गावी सर्वांचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला आहे. गावी घरी त्यांचा मोठा भाऊ शिवाजी, वडील, पत्नी सुजाता आणि सहा वर्षाची मुलगी असा त्यांचा परीवार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मोहिमेसाठी ते सराव करत असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सुजाता यांनी दिली.याआधी डीसीपी सुहेल शर्मा आणि नाईक शेख रफिक ताहेर यांनी हे शिखर सर केल्याची नोंद आहे.