अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबानचं सरकार अस्तित्वात आलेलं नाही. पण त्याआधीच अफगाण लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. त्यातही अफगाण महिला तालिबान्यांच्याविरोधात रस्त्यावर पुन्हा पुन्हा उतरतायत. त्यांना उत्तर म्हणून तालिबानी बंदुकीचा आधार घेतायत. आजही राजधानी काबूलमध्ये तालिबानच्याविरोधात एक मोठा मोर्चा निघाला. ह्या मोर्चात महिलांचं प्रमाण मोठं होतं. मोर्चात सहभागी झालेल्या अफगाण जनतेनं तालिबान मुर्दाबादचे नारे दिले. विशेष म्हणजे ह्या मोर्चात पाकिस्तानच्या बरबादीसाठी दुवा मागितली गेली.
तालिबाननं पंजशीरवर कब्जा केल्याची घोषणा केलीय. पण अजूनही अहमद मसूद, अमरुल्ला सालेह यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. उलट नॉर्दन अलायन्स हे तालिबान्यांच्याविरोधात पाय रोवून लढत असल्याचं जाहीर केलंय. काबूलमध्ये जी तालिबानविरोधी रॅली काढण्यात आली त्यात शंभरपेक्षा जास्त जण सहभागी होते. ह्यात महिलांचं प्रमाण अधिक होतं. आंदोलकांनी पाकिस्तानी राजदुताबाहेर जोरदार प्रदर्शन केलं. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये ढवळा ढवळ करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याच वेळेस पाकिस्तानच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. पाकिस्तान मुर्दाबाद, पंजशीर जिंदार रहे असे नारेही यावेळेस लावले गेले. विशेष म्हणजे यावेळेस महिलांनी, पंजशीरमध्ये ना तालिबान, ना पाकिस्तान, कुणालाही घुसू दिलं जाणार नसल्याची प्रतिज्ञा केली. ‘रेजिस्टेंस फोर्स अमर रहे’च्या घोषणाही दिल्या गेल्या.
हे ही वाचा:
केंद्रीय मंत्र्याला अटक करतात पण माजी गृहमंत्री मात्र सापडत नाही
आता ‘या’ क्षेत्रातही होणार खाजगीकरण
५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही
मोदी एक्स्प्रेसमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा गजर
अफगाणिस्तानचा कब्जा करुन तालिबानला आता वीस दिवसांपेक्षा जास्त काळ लोटतोय. सरकार बनवण्यावरुन तालिबान, हक्कानी नेटवर्क यांच्या तणावपूर्ण स्थिती आहे. परिणामी तालिबानच्याविरोधात अफगाणी जनतेतही रोष वाढताना दिसतोय. त्यातल्या त्यात पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआयनं ज्याप्रमाणे अफगाणिस्तानच्या कारभारात, लोकांच्या आयुष्यात ढवळा ढवळ केलीय, त्यानेही अफगाण जनता संतप्त आहे. शेकडो अफगाण महिला आणि पुरुषांनी हातात तालिबान, पाकिस्तानविरोधी बॅनर घेऊन जोरदार प्रदर्शन केलं. संतप्त झालेल्या अफगाण जनतेनं आझादी, आझादीचे नारे लगावले तसच पाकिस्तान की मौत, आयएसआय की मौत अशी नारेबाजी, बॅनरबाजीही केली. महिला ज्याप्रमाणं रस्त्यावर उतरतायत ते पहाता फक्त तालिबानच नाही तर पाकिस्तानलाही चांगलीच धडकी भरलीय.