अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अनिल देशमुख यांची दिवाळी यावेळीही तुरुंगातच जाणार हे निश्चित झाले आहे. १०० कोटींच्या खंडणीप्रकरणी अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता.

अनिल देशमुख यांना याच प्रकरणात ईडी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला आहे. ईडीकडून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी सीबीआय कोर्टात जामिनासाठी अपीलही केले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आज सीबीआय न्यायालयाने निकाल देताना अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला.

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एसएच ग्वालानी यांनी गुरुवारी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती . सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना गेल्या आठवड्यात ‘कोरोनरी अँजिओग्राफी’साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून ४.७ कोटी रुपये गोळा केल्याचा दावा ईडीने केला होता. चुकीने कमावलेले पैसे नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेला पाठवण्यात आल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.

Exit mobile version