योगशिक्षिका ऍनेलीज रिचमंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संयुक्त राष्ट्रातील मुख्यालयाच्या सत्राचे नेतृत्व केले. हा अनुभव ‘आनंददायक’ असल्याचे वर्णन करतानाच पंतप्रधानांसोबत प्रमुख कार्यक्रमाचे नेतृत्व करणे हा ‘सन्मानक्षण’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ऍनेलीज रिचमंड या एक योग शिक्षक आणि अमेरिकेतील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या संचालक आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले. त्यांनी हा अनुभव आनंददायक असल्याचे तसेच, पंतप्रधानांसोबत या प्रमुख कार्यक्रमाचे नेतृत्व केल्याने मी सन्मानित झाल्याचे म्हटले आहे. ‘पंतप्रधान मोदी मंचावर आले आणि त्यांनी आमचे खूप प्रेमाने स्वागत केले. त्यांनी आम्हा सर्वांना भारतात आमंत्रित केले आहे. त्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला,’ असे त्या म्हणाल्या.
रिचमंड यांनी त्यांच्या योग तंत्राबद्दल पंतप्रधानांचे कौतुक केले. ‘ पंतप्रधान खूप चांगले अभ्यासक आहेत. ते ज्या प्रामाणिकपणाने सराव करतात, ते तुम्ही पाहू शकता,’ असे त्या म्हणाल्या. त्यांनी श्री श्री रवीशंकर यांच्या अंतर्गत भारतात योग आणि ध्यानाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्या स्काय कॅम्पस हॅपीनेसच्या संचालकही आहेत. अमेरिकेमधील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांच्यातर्फे कार्यक्रम चालवले जातात.
योगासने जगासमोर आणल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुकही केले. ‘मला वसुदेव कुटुंबकम् ही दृष्टी आवडते. सर्व जग हे एक कुटुंब आहे. योग आणि श्वासोच्छवासाची तंत्रे लोकांना चिंता आणि नैराश्याचा सामना करण्यास मदत करतात,’ असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू
कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी
पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा
…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ
या ऐतिहासिक योग सत्राला संयुक्त राष्ट्रांचे सर्वोच्च अधिकारी, राजदूत, सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी तसेच १८० हून अधिक देशांतील प्रमुख लोक उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ने केली आणि दूरवरून न्यूयॉर्कला आलेल्या लोकांचे आभार मानले. ‘तुम्हा सर्वांना पाहून मला आनंद झाला. येथे आल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. येथे आज जवळपास प्रत्येक राष्ट्रीयत्वाचे प्रतिनिधित्व केले गेले आहे,’ असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष साबा कोरीसी, उप महासचिव अमिना मोहम्मद आणि न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ऍडम्स, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअर, अय्यंगार योगा प्रवर्तक डेइड्रा डेमेन्स आणि प्रख्यात अमेरिकन गायिका मेरी मिलबेन या नामवंत व्यक्ती जवळपास ४५ मिनिटे चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थित होत्या.