पॅलेस्टाइनमधील वेस्ट बँक भागातील जेनिन शहरावर इस्रायली लष्कराने सोमवारी ड्रोन हल्ला केला. यात आठ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वेस्ट बँक भागातील ही गेल्या २० वर्षांतील सर्वांत मोठी मोहीम मानली जात आहे.
या भागात इस्रायली सैनिक आणि जेनिन ब्रिगेड यांच्या दरम्यान दिवसभर बंदुकीचे गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. जेनिन ब्रिगेड हा शहरातील दहशतवादी गट असून त्यांचा तळ शहरातील निर्वासितांच्या शिबिरात आहे.
निर्वासितांच्या शिबिरामध्ये जे काही सुरू आहे, ते युद्ध आहे. या शिबिराला लक्ष्य करून गोळीबार केले जात आहेत. प्रत्येक वेळी सहा ते सात रुग्णवाहिका येथे येतात आणि जखमींना घेऊन जातात, असे पॅलेस्टिनी रुग्णवाहिकेचा चालक खालीद अलाहमद याने सांगितले.
सकाळच्या वेळेस किमान सहा ड्रोन शहरावर आणि लगतच्या शिबिरांवर घिरट्या घालत होते. येथील अर्धा चौरस किमी क्षेत्रात सुमारे १४ हजार निर्वासित राहतात. गेल्या वर्षभरापासून जेनिनसारख्या शहरांवर लष्करांचे हल्ले होणे हा नित्याचाच भाग बनून राहिला आहे. येथे पॅलेस्टिनी नागरिकांकडून इस्रायली नागरिकांवर हल्ले होतात. तर, कधी ज्यू जमाव पॅलेस्टिनी गावांवर हल्ले करतात.
या हल्ल्यात जेनिमधील किमान आठ जण मारले गेले असून सुमारे ५०जण जखमी झाले आहेत. तर, रमल्ला येथे आणखी एक माणूस डोक्याला गोळी लागून मारला गेला.
हे ही वाचा:
रोममधील कोलोजियमच्या भिंतीवर नाव लिहिणाऱ्या जोडप्याची ओळख पटली
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अमोल मुझुमदार यांची निवड?
इंदूर धुळे मार्गावर ट्रक हॉटेलमध्ये घुसला; ७ ठार
भारतात मुस्लिम पर्सनल लॉ हवा तर मग अमेरिका, ब्रिटनमध्ये तशी मागणी का केली जात नाही?
जेनिन ब्रिगेडच्या दहशतवाद्यांनी एका इमारतीमध्ये त्यांचा तळ बनवला होता. त्यांना लक्ष्य करण्यासाठी आमच्या सैनिकांनी हल्ला केला, असे इस्रालयी लष्करातर्फे सांगितले जात आहे. निर्वासितांच्या शिबिराचा आसरा घेऊन पायाभूत सुविधा नष्ट केल्या जात आहेत तसेच, दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हे हल्ले केल्याचे इस्रायली सैनिकांचे म्हणणे आहे.