भारतीय अॅथलीट अमित खत्रीने शनिवारी नैरोबी येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. अमितने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले असून त्याने ही स्पर्धा ४२ मिनिट १७.९४ सेकंदात पूर्ण केली. चालण्याच्या शर्यतीत भारताचे हे जागतिक पातळीवरील पहिलेच पदक आहे. तसेच एका जागतिक ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत दोन पदके जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे.
सुरुवातीपासून शर्यतीत अमित आघाडीवर होता, पण ड्रिंक टेबलवर काहीकाळ थांबल्याने केनियाच्या हेरिस्टोनने त्याला पाठीमागे टाकले. त्यानंतर त्याने अमितला आघाडीची संधी दिली नाही. अमितने ४२ मिनिट १७.९४ सेकंदांसह ही शर्यत पूर्ण केली, तर केनियाच्या हेरिस्टोन याने ४२ मिनिट १७.८४ वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
हे ही वाचा:
यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका
त्या मुलीने अचूक ओळखले ‘छोटे सर’ला आणि पाठवले तुरुंगात
कल्याण स्थानकात गर्दुल्यांची गर्दी
जुन्याच कंत्राटदाराकडून काम केल्यामुळे नवी ‘डोकेदुखी’
स्टेडियम समुद्र सपाटीपासून उंचावर असल्यामुळे श्वसनाचा थोडा त्रास झाला. तसेच शेवटच्या फेरीत अपात्र ठरेल हा विचार मनात आल्याने काही क्षण विचलित झालो. मात्र पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकल्याचा आनंद अधिक आहे, असे अमितने सांगितले.
मुलींच्या १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताच्या बलजित कौरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने ४८ मिनिटे ५८.१७ सेकंदात शर्यत पूर्ण केली. मुलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाला प्राथमिक फेरीत सहावे स्थान मिळाल्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. भारतीय संघाने ३ मिनिटे १०.६२ सेकंद वेळ दिली.